पुणे : पुणे शहरातील गोळीबार मैदान चौकातील कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून बुधवारपासून (२७ नोव्हेंबर) प्रायोगिक तत्त्वावर वाहतूक बदल करण्यात येणार आहेत. पुणे-सोलापूर रस्त्यावरील गोळीबार मैदान चौक अरुंद असंल्याने या भागात वाहतूक कोंडी होत असते. येथील कोंडी सोडविण्यासाठी या भागातील वाहतूक व्यवस्थेत बुधवारपासून तात्पुरते बदल करण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली आहे.
सोलापूर रस्ता, तसेच पूलगेटकडून गोळीबार मैदान चौकातून डावीकडे वळून रक्षा लेखा नियंत्रक कार्यालय (सीडीओ) चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना मनाई करण्यात आली आहे. तसेच सीडीओ कार्यालय चौकाकडे जाणाऱ्या वाहनांनी सोलापूर बाजार, नेपीयर रस्ता, खटाव बंगल्यामार्गे सीडीओ चौकाकडे जावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.