पुणे : पुणे शहरासह जिल्ह्यात दरोडा, घरफोडी तसेच चोरीच्या घटनामध्ये वाढ होताना दिसत आहे. असं असताना आता एका लग्न समारंभामधून नवरीच्या नातेवाईकांचे तब्बल दीड लाख रुपयांचे दागिने लंपास करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना शनिवारी (दि. २३) नगर रस्त्यावरील एका मंगल कार्यालयात घडली आहे.
याबाबत माधुरी रमेश साळुंके (वय-५४, रा. राजेंद्रनगर, वडगावशेरी) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साळुंके यांच्या मुलीचा विवाह नगर रस्त्यावरील पेरणे फाटा येथील सिद्धेश्वर मंगल कार्यालयात होता. शनिवारी हा विवाह सोहळा पार पडला. विवाह समारंभानंतर फिर्यादी वधू-वराबरोबर छायाचित्र काढण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी पिशवीत दागिने ठेवलेले होते. त्यांनी ही पिशवी स्टेजवर ठेवली होती. चोरट्यांनी संधी साधत दागिने आणि रोकड ठेवलेली पिशवी पळवून नेली. या घटनेचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे आहेत.