पुणे : विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. त्यानंतर आता पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यात मंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याबाबत चर्चाना सुरुवात झाली आहे. बारामती- अजित पवार, आंबेगाव- दिलीप वळसे-पाटील, कोथरूडचे चंद्रकांत पाटील यांची नावे मंत्रिपदासाठी निश्चित मानली जात आहेत. दरम्यान, माधुरी मिसाळ, राहुल कुल, सुनील शेळके आणि महेश लांडगे यांची मंत्रिपदासाठी वर्णी लागणार का? अशी चर्चा आहे.
विधानसभा निवडणुकीत पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यात २१ मतदारसंघांमध्ये महायुतीचे १८ आमदार, तर महाविकास आघाडीचे दोन आमदार आणि १ अपक्ष आमदार निवडून आले आहेत. सलग आठव्यांदा निवडून येण्याचा मान अजित पवार, दिलीप वळसे-पाटील यांना मिळाला आहे. त्यामुळे अजित पवार आणि दिलीप वळसे-पाटील हे मंत्री होणार आहेत. तर, भाजपच्या कोट्यातून चंद्रकांत पाटील हे पुन्हा मंत्री होणार आहेत. त्याचबरोबर पर्वतीच्या माधुरी मिसाळ, दौंडचे राहुल कुल, मावळचे सुनील शेळके आणि भोसरीचे महेश लांडगे यांची राज्यमंत्रिपदासाठी वर्णी लागेल, असे बोलले जात आहे. त्यामुळे यातून मंत्रिपदाची वर्णी कोणाची लागणार? याची चर्चा चालू आहे.