पुणे : वराह पालन व्यवसायातील व्यवहाराचे पैसे थकल्याने देणेकऱ्याकडून केल्या जात असलेल्या मानसिक छळाला कंटाळून भवानी पेठेतील व्यावसायिकाने शनिवारी (दि. २३) गळफास घेऊन आत्महत्या केली. राजा परदेशी (वय ४४, रा. महाराष्ट्र तरुण मंडळा शेजारी, हरकानगर, काशेवाडी, भवानी पेठ) हे आत्महत्या केलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. त्यांची पत्नी कंचन राजा परदेशी (वय ३८, रा. काशेवाडी, भवानी पेठ) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. त्यानुसार पोलिसांनी लक्कडसिंग याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
परदेशी यांचे ताडीवाला रोड येथे गोदाम होते. लक्कडसिंग त्यांना डुक्कर पुरविण्याचे काम करत असे. परदेशी डुक्करांचे मांस या गोदामात ठेवत असे. तसेच, ग्राहकांच्या मागणीनुसार त्यांना पुरवठा करत असे. पावसाळ्यात त्यांच्या गोदामात पुराचे पाणी शिरले आणि सर्व मांस खराब झाल्याने त्यांचे १० लाख रुपयांचे नुकसान झाले. ते या नुकसानीतून सावरत असतानाच लक्कडसिंग त्यांच्याकडे पैशांसाठी तगादा लावत होता. तसेच, तो मुलांना पळवून नेण्याच्याही धमक्या द्यायचा. त्याच्या त्रासाला कंटाळून परदेशी यांनी शनिवारी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.