पुणे : आजवर कधी निवडणुका जाहीर झाल्यावर इंधनाच्या दरात वाढ झाल्या असं कधी बघायला मिळालं नाही. मतदान झाले, निकाल लागला की गॅस, पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ होत असल्याचे नेहमी चित्र बघायला मिळालं आहे. आता मात्र निकाल लागण्यापूर्वीच सीएनजीच्या दरात तब्बल २ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.
सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांनी वाढ
महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीने आजपासून प्रति किलो २ रुपयांनी सीएनजीच्या दरात वाढ करण्याची घोषणा करण्यात आली आहे. यापूर्वी सीएनजीचा दर प्रति किलो ८५.९० रुपये होता. आता तो ८७.९० रुपये प्रति किलो राहणार आहे. ही दरवाढ आजपासूनच लागू करण्यात आली आहे. आज सकाळी पेट्रोल पंपावर गॅस भरण्यासाठी गेलेल्या रिक्षाचालक, कॅब चालकांना दरवाढ झाली असल्याची माहिती मिळाली.
यापूर्वी ९ जुलै २०२४ रोजी सीएनजीच्या दरात प्रति किलो दीड रुपये वाढ करण्यात आली होती. आता महानगर गॅस लिमिटेडनेही सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपये वाढ केली आहे. मुंबई व परिसरात सीएनजीचा दर ७७ रुपये प्रति किलो झाला आहे.