बीड : बीडमधुन एक हृदयद्रावक घटना घडल्याचे समोर आले आहे. पतीचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना पत्नीला कळताच धक्का सहन न झाल्याने पत्नीने टोकाचं पाऊल उचललं आहे. पतीच्या निधनानंतर विरह सहन न झाल्याने पत्नीनेही आपलं जीवन संपविल्याची घटना घडली आहे. यानंतर दोघांचेही एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. बीडच्या खामकरवाडी गावातील या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खामकरवाडी या गावातील रहिवासी असलेले शिक्षक कन्हैयालाल पांडुरंग खामकर (वय 48) हे शिरूर शहरांमध्ये राहण्यास होते. कन्हैयालाल यांचे बायपासचे ऑपरेशन झालेले होते. गेल्या काही दिवसांपासून खामकरवाडी येथे ते कुटुंबासहित राहत होते. गुरुवारी पहाटे त्यांच्या प्रकृतीमध्ये अचानक बिघाड झाल्याने त्यांना शिरूर शहरातील खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. त्यावेळी उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
गावाकडे या घटनेची माहिती कळताच खामकर परिवारासह, गावावरती मोठा दुःखाचा डोंगर कोसळला. आपल्या पतीच्या मृत्यूची बातमी पत्नी राहीताई कन्हैयालाल खामकर (वय 42) यांना कळताच त्यांना मोठा धक्का बसला. हा धक्का राहीताई यांना सहन न झाल्याने त्यांनी काही वेळाच्या आतच स्वतःच जीवन संपवले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
विषारी द्रव प्राशन करून संपवलं जीवन..
पहाटे पतीच्या निधनाने शोकाकूल आणि व्यथित झालेल्या त्यांच्या पत्नी राहीताई खामकर यांनी कोणालाही कळू न देता विषारी द्रव प्राशन केल. सकाळी सहा वाजता त्यांना त्रास सुरू झाल्यानंतर उपचारासाठी दवाखान्यात नेले. यावेळी राहीताई खामकर यांनी उपचारासाठी घेऊन जाणाऱ्या लोकांना मलादेखील माझ्या पतीच्या चितेवरच अग्निडाग द्या, असे त्या सांगत होत्या.
शिरूर येथील खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर बीडला पुढील उपचारासाठी नेताना वाटेतच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. खामकरवाडी येथील स्मशानभूमीत एकाच चितेवर कन्नालाल खामकर आणि पत्नी राहीताई खामकर दोघांना अग्निडाग देण्यात आला.