सिंधुदुर्ग : येथील मालवणच्या राजकोट किल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची दुर्दैवी घटना गेल्या काही दिवसांपूर्वी घडली होती. या प्रकरणावरून राज्याचे राजकारण चांगलेच ढवळून निघाले होते. याप्रकरणी राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. दरम्यान, या पुतळा दुर्घटनेतील मुख्य आरोपी चेतन पाटील आणि जयदीप आपटे यांना अटक करण्यात आली होती. त्या दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान, चेतन पाटील याला मुंबई हायकोर्टाने जामीन मंजूर केला आहे.
राजकोट किल्ला परिसरात उभारलेला शिवपुतळा अवघ्या आठ महिन्यांत कोसळला. या घटनेने पुतळा उभारणीचे निकृष्ट काम उघड झाल्यानंतर शिल्पकार जयदीप आपटेला दि. 04 सप्टेंबर रोजी कल्याणमधून अटक करण्यात आली. सहआरोपी चेतन पाटील याला दि.30 ऑगस्ट रोजी अटक केली होती. या दोघांचा सिंधुदुर्ग जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर अॅड. निरंजन मुंदरगी आणि अॅड. गणेश सोवनी यांच्यामार्फत त्यांनी उच्च न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल केली.
दरम्यान, पोलिसांनी दोघांविरोधात आरोपपत्र दाखल केल्याने त्यांनी कनिष्ठ न्यायालयात दाद मागण्याची भूमिका घेतली होती. मात्र, न्यायालयाने राज्य सरकारला आरोपपत्राची प्रत सादर करण्याचे निर्देश देत सुनावणी निश्चित केली होती. त्यानुसार चेतन पाटील याच्या अर्जावर गुरुवारी न्यायमूर्ती अनिल किलोर यांच्यासमोर सुनावणी झाली.
पुतळ्याचा स्ट्रक्चरल डिझायनर म्हणून नियुक्ती न केल्यामुळे पाटील यांना या प्रकरणात गोवण्यात आलेले नाही, असे न्यायमूर्ती ए.एस. किल्लोर यांच्या एकल खंडपीठाने गुरुवारी सांगितले. याप्रकरणी, पाटील यांनी केवळ पुतळ्याच्या पायाचा स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी अहवाल सादर केला होता. दरम्यान, जयदीप आपटेनं हा पुतळा बनवला होता, तर स्ट्रक्चरल डिझायनरसाठी चेतन पाटील यांची नियुक्ती केल्याचं सांगण्यात येत होतं.