रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात 20 नोव्हेंबर 2024 मतदानाची प्रक्रिया पार पडली. त्यानंतर आता निवडणूक निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येत्या 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्याआधी मतपेट्या सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आल्या आहेत. मतपेट्यांना कोणतीही हानी पोहोचू नये यासाठी त्यांना 24 तास सीसीटीव्हींची सुरक्षा पुरवण्यात आली आहे. दरम्यान, चिपळूमध्ये मात्र स्ट्राँग रुमच्या परिसरात मोठी घटना घडल्याचे समोर आले आहे. येथे स्ट्राँग रुमच्या परिसरात फिरणाऱ्या संशियतांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलं आहे.
अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांची गर्दी
मिळालेल्या माहितीनुसार चिपळूणमध्ये स्ट्राँग रूमच्या परिसरात काही लोक फिरताना दिसून आले होते. ही बाब समोर आल्यानतर अजित पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यानंतर अजित पवार गटाचे कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने चिपळूण पोलीस स्थानकाच्या बाहेर एकत्र झाले होते.
दोन संशयितांचा पोलिसांकडून शोध सुरू
हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांच्या ताब्यात असलेले संशयित तेथील स्थानिक असल्याची माहिती मिळत आहे. तर अन्य दोघे पळून गेले आहेत. या संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत. रात्री उशिरापर्यंत चिपळूण पोलिस स्टेशनच्या आवारात महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
स्ट्राँग रुमच्या परिसरात फिरत असलेल्या संशयितांची एक कार ताब्यात घेण्यात आली असून या कारमध्ये संशयितांचे सामान सापडले आहे. कारमध्ये एक काळ्या रंगाची छोटी बॅग आहे. या बॅगमध्ये पैसे आहेत. तसेच हँडग्लोजही दिसून आले आहेत. पोलीस संशयितांचा शोध घेत आहेत.