राहुलकुमार अवचट / यवत : गेल्या दोन दिवसांपासून बिबट्याच्या वाढत्या हल्ल्याने दौंड तालुक्यातील उत्तरेकडील अनेक गावातील नागरिक दहशतीखाली आहेत. याच पार्शवभूमीवर अखिल भारतीय मराठा महासंघ दौंड तालुका यांच्यावतीने आज दौंड वनविभाग कार्यालय यांना निवेदनद्वारे उपोषणाचा इशारा दिला आहे.
दौंड तालुक्यामधील व परिसरामध्ये बिबट्याच्या वाढत्या उपद्रवामुळे परिसरातील जनता दहशतीखाली आली आहे, परिसरामध्ये बिबट्याचा वावर वाढल्यामुळे जनतेचे मोठ्या प्रमाणावरती आर्थिक व शारीरिक नुकसान होत आहे. यामध्ये नागरिकांच्या पशुधनाची हानी खूप मोठ्या प्रमाणात आत्तापर्यंत झालेली आहे. तसेच बिबट्याने कालच दौंड तालुक्यातील बोरीपार्धी येथील अडीच महिन्याच्या लहान मुलावरती हल्ला केल्याने बाळाला जीव गमवावा लागल्याने परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरत चालली आहे.
सर्व सामान्य नागरिकांनी वन विभागाला जाब विचारण्यास सुरुवात केली आहे, त्यामध्ये प्रामुख्याने लहान मुलांच्या जीविताचा प्रश्न निर्माण झालेला आहे. शाळेमध्ये जाणारी लहान मुले मोठ्या दहशतीमध्ये आहेत. त्याचबरोबर शेतामध्ये मजुरी करणारे, शेतकरी व महिलावर्ग खूप मोठ्या दहशती खाली जगत आहे. या सर्व बाबींची वारंवार माहिती वनविभागाला देऊनही कुठल्याही प्रकारची तरतूद वनविभाग करताना दिसून येत नाही.
दौंड तालुक्यातील प्रामुख्याने बोरीपार्धी, केडगाव, नांनगाव, कानगाव, कडेठाण, हातवळण, जाणाईमाळा – वरवंड, पाटस व अन्य गावांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बिबट्याचा वावर वाढलेला आहे. तरी या घटनेची लवकरात लवकर दखल घेऊन येत्या ८ दिवसांमध्ये प्रतिबंधक कारवाई करण्यात यावी, अन्यथा वन विभागाच्या कार्यालयासमोर संपूर्ण दौंड तालुक्यातील लहान मुले, महिला, पुरुष, तरुण वर्ग, ज्येष्ठ नागरिक हे बेमुदत उपोषण करतील, असा इशारा अखिल भारतीय मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे वन विभागाला दिला आहे. यावेळी मराठा महासंघाचे दौंड तालुका युवक अध्यक्ष गणेश दिवेकर, प्रशांत तडगे, तुषार शेळके, विकास शितोळे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.