पुणे : सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. या काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची सर्वप्रथम सर्वांनी काळजी घ्यावी. मतदान केंद्रावर कोणतीही गैरसोय होणार नाही याची जबाबदारी त्या-त्या गावचे तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील व तेथील शासन नियुक्त कर्मचाऱ्यांची असणार आहे. मतदानाला जाताना मोबाईलमधील पुरावा ग्राह्य धरला जाणार नाही. तर 100 मीटरच्या आत मोबाईल वापरण्यास बंदी आहे. तसेच चिन्ह असलेली कोणत्याही राजकीय पक्ष अथवा अपक्ष उमेदवाराची चिठ्ठी मतदाराला दिल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
सोमवारी 18 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता प्रचार बंद होऊन बॅनर्स, पोस्टर्स काढून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बुधवारी (ता. 20) होणाऱ्या मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या 200 मीटर अंतरापर्यंत यात्रा, उरुस, भजन, कीर्तन, प्रवचन ठेवता येणार नाही. मतदान केंद्रे 70 टक्के वेबकास्ट केली गेली आहेत. त्यामुळे सर्व प्रकार कॅमेऱ्यांमध्ये कैद होत आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर मेडिकल किट आशा सेविकांकडे देण्यात येईल. 100 मीटरच्या आत मोबाईल घेऊन कोणालाही प्रवेश करता येणार नाही, अन्यथा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर क्रमांक लिहिला आहे का, पुरेसे फर्निचर, लाईट, पाणी, प्रसाधनगृह, आवश्यक त्या ठिकाणी मंडपाची सोय करावी लागणार आहे. याशिवाय मतदान केंद्रावर जारचे पाणी पुखण्यात यावे, साहित्याची देवाण-घेवाण करण्यासाठी ज्या ग्रामसेवकांची नेमणूक आहे, त्यांनी या कामाबरोबरच स्वतःच्या गावातही जबाबदारी पार पाडायची आहे.
आयोगाच्या सूचना
-चिन्ह असलेली चिठ्ठी दिल्यास गुन्हा दाखल होणार
-मतदानाच्या दिवशी आठवडा बाजार बंद राहतील
-मोबाईलमधील पुरावा ग्राह्य धरला जाणार नाही
-दिव्यांग व 80 वर्षांवरील वयोवृद्धांच्या सोईसाठी वाहन व्यवस्था
-100 मीटरच्या आत मोबाईल नेता येणार नाही
-केंद्रे 70 टक्के वेबकास्टिंगने जोडावी लागणार
-मतदान केंद्रावरील सर्व सोय ग्रामसेवक, तलाठी करतील
-अनुचित प्रकार घडल्यास गंभीर दखल घेतली जाणार
-12 पुराव्यांपैकी एक पुरावा घेऊनच मतदानास यावे
-मतदान केंद्रावर वीज, पाणी, स्वच्छतागृह, आवश्यक तेथे मंडप उभारावे