मुंबई : महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरु आहे. आज राज्यातील निवडणुकीच्या प्रचाराची सांगता होणार आहे. अशातच अनेक राजकीय घटना घडताना दिसत आहेत. याचदरम्यान आज राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. त्यांनी भर पत्रकार परिषदेत काही पोस्टर्स दाखवून भाजपा आणि विरोधकांना चांगलंच घेरलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला ‘एक है तो सेफ है’ हा नारा लिहिलेला होता. राहुल गांधी यांनी या ना-याची खिल्ली उडवत मोदी सरकारचा हा नारा नेमका काय आहे हे महाराष्ट्रातील जनतेला समजावून सांगितले. राहुल गांधी यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेत धारावीच्या मुद्दयावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गौतम अदानी यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले, “भाजप या निवडणुकीत लक्ष वळवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र आम्ही असे होऊ देणार नाही. महाआघाडी सरकारच्या काळात अनेक मोठे प्रकल्प होणार असल्याचे ते सांगत आहेत. इथून ते बाहेरगावी गेले आहेत, पण त्यांच्या काळात 7 प्रकल्प वेगवेगळ्या राज्यात गेले आहेत, त्यापैकी सर्वाधिक प्रकल्प गुजरातमध्ये गेले आहेत. “येथील तरुणांच्या भवितव्याशी सरकार खेळत आहे. त्यांना नोकऱ्यांबद्दल बोलायचे नाही. याचा विचार महाराष्ट्रातील तरुणांना करावा लागेल.”
धारावी हा भाग देशातील लघु आणि सूक्ष्म उद्योगांचा महत्त्वाचा भाग आहे. धारावीला एका व्यक्तीसाठी संपवलं जात आहे. नरेंद्र मोदी यांनी एक है तो सेफ है असा नारा दिलाय. मात्र एक कोण आहे आणि सेफ कोण आहे? हाच खरा प्रश्न आहे. पंतप्रधानांचे अदानीसोबत जुनं नातं आहे. सर्वकाही एकट्याने शक्य नाही. अदानी एकटे काहीच करु शकत नाही. त्यांना मोदींचा सपोर्ट आहे. महाराष्ट्राची संपत्ती ही महाराष्ट्रातील जनतेला मिळेल की या एक व्यक्तीला मिळेल, असा सवाल राहुल गांधी यांनी केला आहे.