इंदापूर : पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तालुक्यातील तावशी येथील स्मशानभूमीमध्ये अज्ञात व्यक्तीचा मृतदेह जाळण्यात आल्याची घटना घडली आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि. १५) रात्रीच्या सुमारास घडला आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून हा प्रकार अंधश्रद्धेतून झाला असावा, अशी चर्चा नागरिक करत आहेत.
नेमकं काय घडलं?
तालुक्यातील तावशी येथील स्मशानभूमीमध्ये शुक्रवारी रात्री अज्ञात मृतदेह जाळण्यात आला असून हा मृतदेह डोके नसलेला असल्याचे दिसून आले आहे. स्मशानभूमीच्या पायरीवर मोठ्या प्रमाणात रक्त देखील सांडलेले आढळून आले आहे. दरम्यान, शुक्रवारी पौर्णिमा असल्यामुळे येथील स्मशानभूमीमध्ये अंधश्रद्धेतून अज्ञात मृतदेह जाळण्यात आला असावा, असा अंदाज नागरिंकाकडून व्यक्त करण्यात येत आहे.
हाडांचा भुगा तपासणीसाठी पाठविला
स्मशानभूमीमध्ये जाळलेल्या मृतदेहाची राख झालेली आहे. त्यामुळे हा मृतदेह माणसाचा आहे, का प्राण्याचा हे ओळखणे अवघड झाले आहे. या घटनेचा वालचंदनगर पोलिसांनी पंचनामा केला आहे. या ठिकाणी सांडलेले रक्त व स्मशानभूमीतील हाडांचा भुगा फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.