केडगाव, (पुणे) : पासलकरवस्ती (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीत भरधाव टेम्पोने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. टेंम्पोने गाडीला जोरदार धडक देत दुचाकीला 100 फूट फरपटत नेले या अपघातात पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर पती व मुलगी जखमी झाली आहे. पारगाव हद्दीतील पासलकरवस्ती येथे गुरुवारी (ता. १४) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
शिवप्रिया योगेश शेलार (वय- 32) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर या अपघातात पती योगेश शांताराम शेलार (वय- 35), मुलगी श्रेया योगेश शेलार (वय -09(, रा. तिघेही जय मल्हार लिफ्टवस्ती, देलवडी, ता. दौंड,) अशी नावे आहेत. याप्रकरणी बंडू सखाराम शेलार (रा. देलवडी, ता. दौंड) यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश शेलार हे गावातील विशाखा कंपनीमध्ये कामगार आहेत. त्यांचा वाढदिवस शुक्रवारी होता. यानिमित्त शिवप्रिया यांनी पारगाववरुन योगेशसोबत येताना केक आणला होता. टेम्पो देलवडीवरून पारगावच्या दिशेने भरधाव वेगाने निघाला होता. यावेळी पारगाववरून देलवडीकडे दुचाकीवर योगेश शेलार, मुलगी श्रेया शेलार व पत्नी शिवप्रिया शेलार येत होते.
यावेळी भरधाव टेंम्पोने दुचाकीला जोरदार धडक दिली. यावेळी दुचाकी १०० फूट फरपटत गेली. यावेळी शिवप्रिया यांच्या डोक्याला व हाताला मार लागल्याने त्यांना तात्काळ केडगाव येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. त्यादरम्यान शिवप्रिया यांना डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मयत घोषित केले.
योगेश यांना किरकोळ मार लागला असून मुलगी श्रेया हिच्यावरती खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. अपघातात योगेश यांच्या दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला आहे. अपघातानंतर टेम्पो ड्रायव्हरने व क्लिनरने पलायन केले आहे. सदरचा टेम्पो हा अमरावती जिल्ह्यातून साखर कारखान्याच्या आगामी गळीत हंगामासाठी ऊसटोळी घेऊन दौंड तालुक्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, शुक्रवारी सकाळी ८ वाजता शोकाकूल वातावरणात शिवप्रिया यांच्यावरती देलवडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. शिवप्रिया यांच्या पाठीमागे पती योगेश शेलार, सासू व सहा वर्षांचा चिमुकला श्रेयस व मुलगी श्रेया परिवार आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.