नवी दिल्ली : जगातील 100 शक्तिशाली उद्योगपतींची यादी सध्या समोर आली आहे. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या नावाचा समावेश आहे. ‘फॉर्च्यून मॅगझिन’च्या पॉवरफुल बिझनेसमन 2024’ च्या यादीत समाविष्ट झालेले अंबानी हे एकमेव भारतीय आहेत. यामध्ये परदेशात स्थायिक झालेल्या भारतीय वंशाच्या इतर सहा लोकांचाही समावेश आहे.
‘फॉर्च्युन’ने नुकतीच ही यादी जाहीर केली आहे. यामध्ये अंबानी 12 व्या स्थानावर आहेत. फोर्ब्सच्या मते, अंबानी हे आशिया आणि भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत, ज्यांची एकूण संपत्ती सुमारे 7.6 लाख कोटी रुपये ($98 अब्ज) आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार भांडवल (मार्केट कॅप) 13 नोव्हेंबर 2024 पर्यंत 16.96 लाख कोटी रुपये आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज पेट्रोकेमिकल्स, रिटेल, मनोरंजन, दूरसंचार आणि इतर क्षेत्रात कार्यरत आहे.
अंबानी कुटुंब पुढील पिढीला त्यांच्या व्यावसायिक साम्राज्याचा वारसा म्हणून काम करत आहे. अंबानींचा मोठा मुलगा आकाश अंबानी रिलायन्स जिओचे अध्यक्ष आहेत. तर धाकटा मुलगा अनंत अंबानी ऊर्जा क्षेत्रात कार्यरत आहे. तर मुलगी ईशा अंबानी रिलायन्स रिटेलचे लीड करत आहे. देशभरात एकूण 33 फॅशन स्टोअर केंद्रे आहेत. आता रिलायन्स रिटेल नोव्हेंबरच्या अखेरीस 20 पेक्षा जास्त स्टोअर बंद करू शकते, अशीही माहिती आहे.
जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती एलॉन मस्क पहिल्या क्रमांकावर असून, एनव्हीडियाचे सीईओ जेन्सेन हुआंग दुसऱ्या क्रमांकावर आहेत. सत्या नडेला तिसऱ्या, वॉरेन बफे चौथ्या आणि जेमी डिमन पाचव्या स्थानावर आहेत. टीम कुक या यादीत 6 व्या स्थानावर आहे. मार्क झुकेरबर्ग 7 व्या तर सॅम ऑल्टमन 8 व्या क्रमांकावर सर्वात शक्तिशाली उद्योगपती आहेत.