पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु असून प्रचारही जोरदार केला जात आहे. विधानसभा निवडणुकीचा प्रचार सध्या अंतिम टप्प्यातपर्यंत पोहोचला आहे. राज्यात 15 ऑक्टोबरपासून आचारसंहिता लागू करण्यात आली. अशातच राज्यात आतापर्यंत 536 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली, यात रोकड, दारू, अमली पदार्थ, मौल्यवान वस्तू यासह विविध गोष्टींचा समावेश आहे.
महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक 20 नोव्हेंबर रोजी होत असून 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीच्या काळात गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आयोगाने राज्यात आचारसंहिता लावली आहे. आयोगाकडून राजकीय पक्ष आणि नागरिकांसाठी काही नियम घालून दिले आहेत. मात्र, यांचे काही जणांना भान नाही. महिनाभरात राज्यात 6 हजारांपेक्षा जास्त आचारसंहिता भंगाच्या तक्रारी दाखल झालेल्या आहेत. त्याशिवाय आयोगाकडून 536 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या महिनाभरात महाराष्ट्रात आचारसंहितेच्या उल्लंघनासंदर्भात 6 हजार 382 तक्रारी प्राप्त झाल्या असून आतापर्यंत 536 कोटींहून अधिक किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता लागू करण्यात आली. दरम्यान, 15 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर या कालावधीत निवडणूक आयोगाच्या सी-व्हिजील अॅपच्या माध्यमातून सहा हजारांहून अधिक तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत, अशी माहिती राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने गुरुवारी जारी केलेल्या पत्रकात दिली आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथक तपास करून योग्य ती कारवाई करते.
सध्या राज्यभरात आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. तसेच सी-व्हिजील अॅपद्वारे नागरिक आचारसंहितेच्या उल्लंघनाबाबत तक्रार दाखल करु शकतात. हे अॅप कोणत्याही अॅपस्टोअरमधून डाऊनलोड करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाद्वारे चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येते.