पुणे : पुण्यातून एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. दागिने खरेदी करण्याचा बहाणा करुन दुकानातील सेल्समनची नजर चुकवून हातचलाखीने दागिने चोरुन नेणार्या बंटी आणि बबलीला लष्कर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून आत्तापर्यंत पुणे, मुंबई, सातारा, सिंधुदुर्ग, तसेच ठाण्यातील ९ गुन्हे उघडकीस आले आहेत.
शेखर हेमराज वानी (वय-३२, रा. शिवाजी पुतळा, मांजरी, हडपसर) आणि शिवानी दिलीप साळुंखे (वय-२४, रा. केशवनगर, मुंढवा, मुळ रा. अकलुज, ता. माळशिरस, जि. सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे कॅम्पातील एका सोन्याच्या दुकानात एक महिला आणि पुरुष आले. त्या दोघांना कानातील टॉप्स घ्यायचे होते. दुकानातील सेल्समन हे त्यांना कानातील टॉप्स एका ट्रे मधून काढून दाखवित होते. त्यावेळी त्यांनी हातचलाखी करुन सेल्समनची नजर चुकवून दोन टॉप्स स्वत:च्या हातामध्ये ठेवले. त्याचवेळी तिच्या बरोबर असलेल्या व्यक्तीने एक टॉप्स हातात घेऊन स्वतःचा मोबाईल खिशामध्ये ठेवण्याचा बहाणा करुन त्यातील एक टॉप्स खिशामध्ये ठेवला.
दरम्यान, दोघेजण काहीही खरेदी न करता तेथून निघून गेले. ते गेल्यानंतर सेल्समन यांनी दुकानातील ट्रेमधील टॉप्स तपासून पाहिले असता, त्यांना तीन टॉप्स मिळाले नाही. त्यांनी दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासून पहिले. त्यावेळी दोघांनी हातचलाखी करुन तब्बल ९५ हजार रुपयांचे ३ टॉप्स चोरुन नेल्याचे निदर्शनास आले आहे. दुकानातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये ते टॉप्स घेऊन दुचाकीवरुन निघून गेले.
मात्र, आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केल्यानंतर महिला केशवनगर येथे रहात असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्या घरी अचानक छापा घातल्यावर दोघेही तेथे आढळले. दोघांनीही चोरीची कबुली दिली आहे. पोलिस चौकशीत दोघांनी मिळून यापूर्वी पुणे शहरात २, मुंबई शहरात १, सिंधुदुर्ग जिल्ह्यात १, सातारा १, पिंपरी चिंचवड शहरात २, ठाणे शहरात १ अशा वेगवेगळ्या ठिकाणी ९ गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. सिंहगड रोड पोलीस ठाण्यातील आरोपींचा एक गुन्हा उघडकीस आला आहे.
ही कामगिरी अपर पोलिस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलिस आयुक्त दिपक निकम यांच्या मार्गदर्शनाखाली लष्कर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीषकुमार दिघावकर, गुन्हे निरीक्षक प्रदीप पवार, सहायक पोलिस निरीक्षक विशाल दांडगे, पोलिस अंमलदार महेश कदम, संदिप उकिर्डे, सोमनाथ बनसोडे, रमेश चौधरी, सचिन मांजरे, लोकेश कदम, हराळ, कोडिलकर, अल्का ब्राम्हणे यांनी केली आहे.