लहू चव्हाण
पाचगणी : चला हवा येऊ द्या काॅमेडी शो मधून घराघरांमध्ये पोहचलेला विनोदवीर भालचंद्र कदम अर्थात ‘भाऊ कदम’ हे तीन दिवसीय ‘आय लव्ह पाचगणी’ फेस्टिवलसाठी उपस्थित राहणार आहे. मी येतोय आपणही उपस्थित राहावे असे आवाहन भाऊ कदम यांनी केले आहे.
या तीन दिवसांच्या उत्सवाला उद्या शुक्रवारपासून (ता. २) सुरवात होत आहे. ग्रामदैवत श्री घाटजाई काळेश्वरीच्या दर्शनाने य छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादनाने सुरुवात होणार आहे.
तसेच सकाळी १० वाजता पाचगणी क्लब येथे आर्ट गॅलरी तर टाउन हॉल येथे रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. सायंकाळी ५ वाजता (कै.) भाऊसाहेब भिलारे क्रीडा भूमीवर शालेय विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने उद्घाटन सोहळा होणार आहे. फेस्टिव्हलच्या तिन्ही दिवसी मुख्य बाजारपेठेत फेस्टिव्हलचा आनंद घेण्यासाठी दाखल होणान्यां सायंकाळी ६ ते रात्रीपर्यंत मुख्य बाजारपेठेत ‘वॉकिंग प्लाझाबरोबर लाईव्ह बँडचा व विविध खाद्यपदार्थांचा मनमुराद आस्वाद घेता येणार आहे.
शनिवारी (ता. ३) व रविवारी (ता. ४) प्रशिक्षित पॅराग्लायडर यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत पॅराग्लाडींगचे आयोजन केले आहे. टेबललॅंन्डवर सकाळी १० रात्री १० पर्यंत काईट फेस्टिव्हल व एसोमॉडेलिंगचा अनोखा नजराणा पाहावयास मिळेल.
मालाज हॉटेल येथे सायंकाळी ४ ते ६ पर्यंत झुंबा डान्सचे आयोजन केले आहे. रविवारी सकाळी ९ ते १२ पर्यंत चारचाकी वाहने व मोटारसायकलचा आधार घेत पाचगणी व परिसरात “ट्रेजर हंट” या ॲडव्हेंचरचा आनंद घेता येणार आहे. सायंकाळी ४ वाजता (कै.) भाऊसाहेब भिलारे क्रीडाभूमीवर टिग ऑफ फ्रेंडशिपचे (रस्सीखेच) आकर्षण ठरणार आहे. सायंकाळी ५ वाजता दांडपट्टयाचे आयोजन केले आहे. रात्री आठ वाजता फलड्रॉ होणार आहे. त्यानंतर फेस्टिवलची सांगता होणार आहे.