शिक्रापूर (पुणे): सरदवाडी (ता. शिरूर) येथील पुणे-नगर महामार्गावर दरोड्याच्या तयारीमध्ये थांबलेल्या तिघांना अटक केली, तर कंटेनर वाहन व दरोड्यासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त केले. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व शिरूर पोलिसांच्या पथकाने ही दमदार कारवाई केली. कुतुबुद्दीन अख्तर हुसेन, यासीन हारुण खान व राहुल रशीद खान अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून, नौशाद व लेहकी असे दोन जण अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले आहेत. याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस हवालदार संजू ज्ञानदेव जाधव (रा. शिरुर ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली.
सरदवाडी (ता. शिरूर) येथील पुणे नगर महामार्गावर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस हवालदार संजू जाधव, राजू मोमीन, जनार्दन शेळके व तुषार पंधारे हे रात्रगस्त घालत असताना येथील हरियाणा, राजस्थान मेवात ढाब्याजवळ काही नागरिक आरजे ५२, जीए ७९१६ या कंटेनरमध्ये दरोड्यासाठी वापरले जाणारे साहित्य घेऊन दरोड्याच्या तयारीमध्ये थांबल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर त्यांनी शिरूर पोलिसांना माहिती देत शिरूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत गिरी, पोलीस हवलदार नाथा जगताप, पोलीस शिपाई निखिल रावडे, नीरज पिसाळ, नितेश थोरात, विजय शिंदे यांना बोलावून घेत कंटेनर जवळ गेले. पोलिसांची चाहूल लागताच दोघेजण पळून गेले.
दरम्यान पोलिसांनी कंटेनरमध्ये पाहणी केली. त्यामध्ये दरोड्याच्या तयारीत असलेले तिघेजण मिळून आले, त्यांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ गॅस सिलिंडर, कटावणी, लोखंडी गज, दोरी यांसह आदी साहित्य मिळून आले. दरम्यान, पोलिसांनी त्यांच्या जवळील कंटेनर तसेच दरोड्यासाठी वापरले जाणारे साहित्य असा तब्बल पंधरा लाख सतरा हजार रुपयांचा ऐवज जप्त केला.