पुणे: विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून ८७ उमेदवार जाहीर करण्यात आले असून, या उमेदवारांच्या प्रचारासाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वतः कंबर कसली आहे. त्यानुसार पवार हे आगामी १२ दिवसांत तब्बल ५५ प्रचार सभा घेणार असून, त्यांच्या प्रचार दौऱ्याची सांगता सभा बारामती मतदारसंघात होणार आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांकडून सध्या पवार यांच्या प्रचार सभांना सर्वाधिक मागणी होत आहे. त्यादृष्टीने पक्षाकडून पवार यांच्या प्रचार सभांचे नियोजन करण्यात आले आहे. पवारांची पहिली प्रचार सभा मंगळवारी बारामती मतदारसंघात पार पडली. या सभेतून पवार यांनी बारामतीतून पुतणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात नातू युगेंद्र पवार यांना निवडून देण्याचे आवाहन बारामतीकरांना केले. गुरुवारपासून पवार विदर्भाच्या प्रचार दौऱ्यावर जाणार आहेत. त्यानंतर ते मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र तसेच पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करणार असून, या काळात ते आपल्या उमेदवारांसाठी दररोज ४ ते ५ सभा घेणार आहेत.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाने महायुती सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडली होती. या काळात अनेक आमदार अजित पवार यांच्या सोबत गेल्याने तसेच मूळ पक्ष आणि चिन्ह गमावल्याने शरद पवार चांगलेच दुखावले गेले होते. परंतु, शांत न बसता पवार यांनी राज्यभर दौरे करत नवे चिन्ह लोकांमध्ये घेऊन जात आपल्या पक्षाला उर्जितावस्था आणली.
लोकसभा निवडणुकीत तर १० जागा लढवून त्यापैकी तब्बल ८ जागा जिंकल्या. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा आत्मविश्वास चांगलाच दुणावला असून, लोकसभेसारखीच कामगिरी करण्याच्या दृष्टीने पुन्हा एकदा शरद पवार अॅक्शन मोडवर आल्याचे दिसत आहेत.