लोणी काळभोर, (पुणे) : लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील माळीमळा परिसरातील मटक्याच्या धंद्यावर रायटर व मटका चालकाच्या मालकाबरोबर तुफान हाणामारी झाल्याने पुणे-सोलापूर महामार्ग तब्बल १५ ते २० मिनिटे बंद झाला होता. या भांडणात रायटरच्या घरातील महिलांनाहि मारहाण झाल्याने त्यांनी पुणे -सोलापूर महामार्गावर झोपल्याने महामार्गावर वाहनांच्या १० ते १२ किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या.
मिळालेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील माळीमळा येथे बुधवारी (ता. ३०) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास मटक्याच्या धंद्यावर रायटर असलेल्या तरुणाला मटक्याचा मालकाने धंद्यावर धिंगाणा करतो, पार्टी करतो असे म्हणून मारहाण केली. त्यानुसार दोन वाजण्याच्या काही नागरिकांच्या मध्यस्तीने दोन वाजण्याच्या सुमारास सदरील भांडणे मिटली होती.
सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास पुन्हा संबंधित मटका चालक व त्याचा भाऊ मटका अड्ड्यावर आले व त्यांनी सदर रायटर यास पुन्हा बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. हि मारहाण घरापासून जवळ राहत असलेल्या रायटरच्या घरच्यांनी पहिली त्यावेळी त्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता सदर मटका मालकाने महिलेच्या कानशिलात लगावली. त्यामुळे सदर महिलांनी आमच्यावर अन्याय होतोय आम्ही गरीब आहोत असे म्हणून पुणे – सोलापूर महामार्गावर जाऊन झोपल्या. त्यामुळे सुमारे १५ मिनिटे हायवे बंद पडला होता.
या घटनेची मिळताच, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे, पोलीस उपनिरीक्षक हनुमंत तरटे, पोलीस अंमलदार अजिंक्य जोजारे, त्यांचे सहकारी आणि ट्राफिक पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तातडीने रस्त्यावर झोपलेल्या पिडीत कुटुंबाला रस्त्यावरून हटविले. आणि पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडविली. यावेळी बघ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती.
दरम्यान, मागील पंधरा दिवसापूर्वी याच मटका धंद्यावर सहा ते सात जणांच्या टोळक्याने कोयते घेऊन दहशत निर्माण हा धंदा लुटला होता. पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी अवैध धंदे बंद करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत. मात्र तरीही पूर्व हवेलीत अवैध धंदे जोमात सुरु आहेत. सदर घटनेमुळे लोणी काळभोर पोलीस काय कारवाई करतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.