गुजरात : गुजरातमधील वासद येथे एक मोठी दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे. निर्माण होत असलेल्या पुलाचा काही भाग अचानक कोसळल्याची घटना घडली आहे. अपघातानंतर ढिगाऱ्याखाली दबल्यामुळे आतापर्यंत एका मजुराचा मृत्यू झाला आहे. पुलाच्या ढिगाऱ्याखालून दोन मजुरांना बाहेर काढण्यात आले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या ढिगाऱ्याखाली आणखी कामगार दबल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा पूल बुलेट ट्रेन प्रकल्पाचा भाग असून तो कोसळला आहे. पुलाचे काम सुरू असताना अचानक पुलाच्या दगडाचा मोठा भाग खाली कोसळला. या दुर्घटनेमध्ये काम करणारे ५ पेक्षा अधिक मजूर ढिगाऱ्याखाली दबले गेले. मोठा आवाज झाल्यानंतर पुलाचा काही भाग काही फूट खाली पडला. आवाज ऐकून आसपास काम करणारे लोक मदतीसाठी घटनास्थळाकडे धावले. दरम्यान या प्रकरणाची माहिती पोलीस आणि अग्निशमन विभागाला देण्यात आली त्यानंतर तेथे बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. घटनास्थळाभोवती बॅरिकेडिंग करून रस्ता बंद करण्यात आला आहे. अनेक रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असल्याची माहिती मिळत आहे.
अपघातानंतर आणंद पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. स्थानिक प्रशासनाने अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. पुलावर काँक्रीटचे मोठे स्लॅब टाकले जात होते, त्यावेळी यातील एक स्लॅब अचानक कोसळला. त्यावेळी तेथे काम करणारे कामगार दबले गेले आहेत. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार घटनास्थळी मदतकार्य सुरू आहे. राजुपुराजवळ वसद नदीजवळ हा अपघात घडला आहे. बांधकाम सुरू असलेल्या पुलावर कामगार काम करत होते अशी माहिती मिळत आहे.