मुंबई : शिवसेना आणि धनुष्यबाण ना उद्धव ठाकरेंची प्रॉपर्टी आहे, ना एकनाथ शिंदेंची, ती माननीय बाळासाहेबांची प्रॉपर्टी आहे. ते गेल्यावर त्यांचा सौदा करता तुम्ही…, असा हल्लाबोल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. सोमवारी ठाणे जिल्ह्यात त्यांनी प्रचाराचा नारळ वाढवला. यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना म्हणाले, शहरांची वाताहत झालीय, राजकारणाची बजबजपुरी करून टाकलीय या लोकांनी, असा उद्वेग व्यक्त करत, ही आताची निवडणूक आहे ती महाराष्ट्राचे भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. जागे व्हा, एकदा मला संधी देऊन बघा, असे आवाहनही राज ठाकरे यांनी मतदारांना केले.
मनसे उमेदवारांसाठी राज ठाकरे यांनी सोमवारी डोंबिवली आणि ठाणे येथे सभा घेतल्या. या सभांमध्ये त्यांनी विद्यमान राजकीय नेत्यांवर जोरदार टीका केली. राजकारणाचा आज पार चिखल झाला आहे. तुम्ही जागे झाला नाहीत तर या चिखलात उभी असलेली मंडळी तुम्हाला कायमसाठी ग्राह्यच धरतील, असा इशाराही राज ठाकरे यांनी यावेळी दिला. पक्ष टिकले नाहीत तरी चालेल, पण महाराष्ट्र टिकला पाहिजे, तुम्ही महाराष्ट्रासाठी जागे राहा, असे आवाहन त्यांनी केले.
यांनी वाट्टेल त्या खेळ्या करायच्या, प्रतारणा करायची आणि जातील कुठे, काय करतील… पैसे फेकले, भांडीकुंडी फेकली, निमूट येतील आम्हाला मतदान करतील, असे तुम्हाला गृहीत धरले जात आहे, याची जाणीव त्यांनी उपस्थितांना करून दिली.
पुढे म्हणाले, माझा एकच आमदार राजू पाटील विधानसभेत होता. पण माझा आमदार विकणारा नाही तर टिकणारा होता. नाहीतर काय प्रकारचं राजकारण सध्या सुरू आहे. विचारांशी प्रतारणा, मतांशी प्रतारणा. तुमच्या मतांचा अपमान. कोणीही काहीही धिंगाणा घालतंय. युतीमधला एक पक्ष फुटतो, मुख्यमंत्रीपद पदरात पाडून घेतो. अडीच वर्षांनी ४० आमदार निघून जातात. त्या आमदारांचा म्होरक्या म्हणतो गेले अडीच वर्षे मला कसंनुसं होत होतं. अजित पवारांच्या मांडीला लावून बसायला लागत होतं. आता तेच अजितदादा मांडीवर येऊन बसले. आता घुसमट बिसमट काहीही नाही, अशी निर्भर्त्सना राज ठाकरेंनी केली.