बारामती : बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांचा वेगळा आणि शरद पवारांचा वेगळा दिवाळी पाडवा पार पडला. शरद पवारांचा पाडवा गोविंद बागेत, तर अजित पवारांचा पाडवा काटेवाडीत पार पडला. यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुनेत्रा पवार यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणल्या, बारामतीकारांनी दादांवर खूप प्रेम केलं आहे. दादांनी बारामतीसाठी खूप काही केलं आहे. नक्कीच बारामतीकर 23 तारखेला दाखवून देतील, असा विश्वास सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला आहे.
पुढे बोलताना सुनेत्रा पवार म्हणल्या, पहिल्यांदाच अशा पद्धतीने काटेवाडीमध्ये पाडवा साजरा करण्यात आला आहे. मात्र, अजित दादांवर प्रेम करणाऱ्या लोकांनी प्रचंड गर्दी केली. दादांना भेटण्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी झाली, याचा आनंद आहे. नक्कीच बारामतीकर 23 तारखेला दाखवून देतील. याच काटेवाडीच्या बंगल्यात पवारांची भाऊबीज साजरी होते. उद्या भाऊबीज आहे त्याच्यासाठी अजून नियोजन पूर्ण झालेला नाही, असंही सुनेत्रा पवार यावेळी म्हणल्या. पुढे म्हणल्या, पवार कुटुंबियात फक्त राजकीय मतभेद आहेत. आम्ही कुटुंब म्हणून एकमेकांना भेटतो शुभेच्छा देतो आणि पवार साहेबांना देखील शुभेच्छा देऊ. मात्र, आतापर्यंत आम्ही भेटलेलो नाही असंही सुनेत्रा पवार म्हणल्या.
यावेळी बोलताना पार्थ म्हणाले कि, आता दरवर्षी दिवाळीचा पाडवा काटेवाडीत साजरा होणार आहे. पहिल्यांदाच जरी बारामतीत पाडवा दोन ठिकाणी होत असला तरी काटेवाडीच्या पाडव्याला खूप चांगला प्रतिसाद लोकांनी दिला आहे. राज्यभरातून लोक अजितदादांना भेटण्यासाठी आले आहेत. यावरूनच आपण अंदाज लावू शकता लोक कुणासोबत आहेत,असं पार्थ पवार म्हणाले.
पुढे म्हणाले, या पुढे दरवर्षी बारामतीत दोन ठिकाणी पाडवा साजरा केला जाणार आहे. अजित पवार हे काटेवाडीमध्येच दिवाळीचा पाडवा साजरा करणार आहेत. तर अजित दादांची आणि शरद पवारांची विचारधारा ही वेगळी आहे, म्हणून आता पक्ष वेगळा झाला आहे. निवडणूक आहे त्यामुळे भाऊबीज देखील आम्ही लोकांसोबतच साजरी करणार आहोत, लोकांमध्ये संभ्रम नको असंही पार्थ पवार यावेळी म्हणाले.