नागपूर : राज्यात सद्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून प्रचाराला आता लवकरच सुरुवात होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत जवळ आली आहे. पण महाविकास आघाडीमध्ये अजून बंडखोरांनी माघार घेतली नाही. त्यामुळे महविकास आघडीच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. अशातच काँग्रेसचे नेते सुनील केदार यांच्या समर्थकांनी उमरेड, हिंगणा आणि रामटेक मतदारसंघातून अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे केदार यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीत मिठाचा खडा पडल्याचे दिसत आहे.
काँग्रेसचे नेते सुनील केदार यांचे समर्थक जि.प.चे समाज कल्याण सभापती मिलिंद सुटे यांनी उमरेड मतदारसंघातून अर्ज भरला आहे. जि.प. सदस्य उज्ज्वला बोढारे आणि वृंदा नागपुरे यांनी हिंगणा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. रामटेकमध्ये अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेले काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांना तर स्वतः केदार यांनी समर्थन दिलं आहे.
हिंगणा मतदारसंघ काँग्रेसकडेच असावा यासाठी केदार यांनी खूप प्रयत्न केले. पण हा मतदारसंघ शरद पवार गटासाठी सोडण्यात आला आहे. पवार गटाकडे जागा गेल्यामुळे या मतदारसंघातून केदार यांना पवार गटाकडून जि.प. सदस्य उज्ज्वला बोढारे किंवा जि.प. सदस्य वृंदा नागपुरे यांना उमेदवारी मिळावी अशी अपेक्षा होती. परंतु, शरद पवार यांनी ते मान्य केलं नाही. त्यांनी या मतदारसंघातून तीन वेळा आमदार राहिलेले माजी मंत्री रमेश बंग यांना तिकीट देण्यात आलं आहे.
हिंगणा मतदारसंघाप्रमाणेच उमरेड मतदारसंघात केदार यांच्या काही मागण्या होत्या. उमरेडमध्ये काँग्रेसडून माजी नगरसेविका दर्शनी धवड यांना नाहीतर जि.प.चे समाज कल्याण सभापती मिलिंद सुटे यांना उमेदवारी मिळावी अशी केदार यांची इच्छा होती. पण काँग्रेस नेतृत्वाने संजय मेश्राम यांना पुन्हा एकदा संधी दित केदार यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं आहे. रामटेकमध्ये ठाकरे गटाचे उमेदवार विशाल बरबटे यांना देण्यात आली आहे. पण या रामटेकमध्येही केदार यांना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मुळक यांना उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते. यासाठी त्यांनी मुंबईत मातोश्रीवर दोन वेळा जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. पण, दोन वेळा भेट घेऊनही काहीच हाती आलं नाही.
या सगळ्या घडामोडींमुळे केदार हे खूप दुखावले गेले. त्यांनी आपल्या सोमवारी संध्याकाळी समर्थकांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी आपल्या समर्थकांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला. रामटेकमधून राजेंद्र मुळक यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. त्या पाठोपाठ हिंगणा आणि उमरेड मतदारसंघातही त्यांच्या समर्थकांनी बंडाचा झेंडा फडकावत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे आता महाविकास आघाडीच्या अडचणींमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे.
काँग्रेसचे नेते केदार यांनी महाविकास आघाडीला अडचणीत आणण्यासाठी आपल्या समर्थकांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे. पण सावनेर मतदारसंघामध्ये केदार यांच्या जागेवर त्यांच्या पत्नी अनुत्ता केदार यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे तीन मतदारसंघात अपक्ष म्हणून समर्थक उतरवले मग सावनेरमध्ये का अपक्ष उमेदवार उतरवला नाही, सावनेरमध्येच उमेदवारी कशी घेतली, असा सवाल महाविकास आघाडीचे कार्यकर्ते विचारत आहेत.