सोलापूर : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार स्वत:चा मतदारसंघ सांभाळत सोलापुरात सुद्धा सक्रिय झाले आहेत. बार्शीत महाविकास आघाडीच्या नेत्यांची ताकद वाढण्यासाठी रोहित पवार अॅक्टिव्ह मोडमध्ये आहेत. करमाळा विधानसभा मतदारसंघात विद्यमान अपक्ष आमदार संजय मामा शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे. संजय शिंदे यांच्या सोबत असणाऱ्या अनेक नेत्यांनी रोहित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार नारायण पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे संजय शिंदे यांना मोठा धक्का बसल्याचे बोललं जात आहे.
तर दुसरीकडे बार्शीतील वैराग भागाचे नेते निरंजन भूमकर यांनी अजित पवारांना रामराम ठोकत रोहित पवारांच्या उपस्थित शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या काळात ठाकरेंचे बार्शीचे उमेदवार दिलीप सोपल यांची ताकद वाढवली आहे. निरंजन भूमकर हे वैराग नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष आहेत, त्यामुळे वैराग भागातून सोपलांना ताकद मिळणार असल्याची चर्चा आहे.
फडणवीस हे नवीन युगाचे जनरल डायर..: रोहित पवार
रोहित पवार म्हणाले, आपली लढाई प्रत्येक मतदारसंघातील उमेदवार विरुद्ध भाजप अशी आहे. फडणवीस हे नवीन युगाचे अभिमन्यू नाहीत तर ते नवीन युगाचे जनरल डायर आहेत. अंतरवाली सराटी येथे लाठीचार्ज झाला. धनगरांना आरक्षण दिले नाही. मराठा , ओबीसी असे अनेक आंदोलन सुरू होती, ती गुजरातच्या पद्धतीने पायाखाली तुडवायची असतात, असे विधान अमित शाह यांनी केले.
‘ही’ काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे..
रोहित पवार पुढे म्हणाले की, अपक्ष आमदार भाजप सोबत मांडीला मांडी लावून बसला त्यामुळे तुम्ही भाजपचेच उमेदवार आहे. आम्ही रीटेवाडी योजना मार्गी लावणार आहोत. आपले सरकार येणार हे काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. लाडकी बहिणी योजना आपण बंद करणार नाही. उलट नव्या पद्धतीने आपण लवकरच जाहीर करणार आहोत.
ही महाराष्ट्र धर्म टिकविण्याची लढाई आहे…
रोहित पवार म्हणाले की, लोकसभा निवडणुकीमध्ये घाबरले व भरमसाठ योजना आणल्या. सत्तेतील नेते येवून कितीही आश्वासने दिली तरी ऐकू नका. बारामती ऍग्रो आता विस्तारीकरण होत असून उसाचे एक टिपूर राहणार नाही. ही महाराष्ट्र धर्म टिकविण्याची लढाई आहे. 10 वर्षात भाजपने महाराष्ट्राची घसरण केली आणि गुजरातची प्रगती केली. ही लढाई स्वाभिमान राखण्यासाठी बळी पडू नका. मताला 500 रुपये दिले म्हणजे फक्त रोज 30 पैसे, तेवढ्यावर मतं विकू नका.