पुणे: कौटुंबिक वादातून पतीपासून सोलापूर येथे विभक्त राहत असलेल्या पत्नीने माहेरच्या व्यक्तींसह पतीच्या घरी येऊन त्याच्या घराचे कुलूप तोडून घरात बेकायदेशीर प्रवेश केला. त्यानंतर घरातील दीड लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, लॅपटॉप व मोबाईल असा मुद्देमाल चोरी करून नेला. तसेच, पतीचे वापरातील कपडे घरात जाळून टाकल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पतीने पत्नीसह सासरच्या व्यक्तीविरोधात लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
याप्रकरणी रेणुका कांबळे ऊर्फ रेणुका सिद्धाप्पा सन्नाके (वय ३२), जनाबाई सिद्धप्पा सन्नाके (वय ६०), सुरेश सिद्धप्पा सन्नाके, आकाश सिद्धप्पा सन्नाके (सर्व रा. कोनापुरे रेल्वे लाईन, रघुजी क्लिनिक जवळ, सोलापूर) या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अनय सूर्यकांत कांबळे (वय ३७, र. वाडेफाटा, तालुका हवेली, पुणे) यांनी तक्रार दाखल केली आहे. अनय आणि रेणुका यांचे २०१४ मध्ये लग्न झाले होते. त्यानंतर आणि रेणुका सासरी राहत असताना तिचे पतीसोबत कौटुंबिक कारणावरून वाद होत होते. त्यामुळे ती पतीस काही न सांगता मुलांसह माहेरी सोलापूर येथे सातत्याने निघून जात होती.
सन २०२२ मध्ये तक्रारदार यांच्या पत्नीने त्यांच्या विरोधात सोलापूर येथील कौटुंबिक न्यायालय येथे पोटगी व कौटुंबिक हिंसाचार अधिनियम अन्वये दावा दाखल केला. त्याची सुनावणी अद्यापपर्यंत सुरू आहे. मात्र, पत्नीने सासरच्या व्यक्तींसह पतीच्या वाडेफाटा येथील घरी येऊन घराचे कुलूप तोडून आतमध्ये बेकादेशीर प्रवेश केला. तसेच, घरातील मुद्देमाल चोरी करून पतीचे वापरातील कपडे जाळले आहेत, याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक घोरपडे पुढील तपास करीत आहेत.