पुणे : अजितदादांना आम्ही आबांच्या जागी बघत होतो. ते आमच्या कुटुंबातील वडीलधारी व्यक्ती होते. त्यांच्याकडून अशा वक्तव्याची अपेक्षा नव्हती. या आरोपांचं खंडन करायला आबा नाहीत. आपली संस्कृती सांगते हयात नसलेल्या व्यक्तीबद्दल आपण बोलत नाहीत, असे आर. आर. पाटील यांच्या कन्या स्मिता पाटील यांनी अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली.
राज्याचे दिवंगत माजी गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी 70 हजार कोटीच्या सिंचन घोटाळ्याच्या चौकशीच्या फाईलवर सही केली होती, असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी सांगलीतील तासगाव येथील सभेत केला होता. तसेच ती फाईल देखील त्यांनी दाखवली होती. यावर नेत्यांकडून संतप्त प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
“अजितदादा वडिलांसमान, पण…”
आर. आर. पाटील हे गृहमंत्री असताना त्यांनी 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळा प्रकरणात अजित पवार यांची उघड चौकशी व्हावी. या फाईलवर त्यांनी सही केली, असे अजित पवार यांनी म्हटलं. आबांना सांगतो होतो की, तंबाखू खाऊ नका. तरी ते माझ्या नकळत ते तंबाखू खायचे, असं अजित पवार म्हणाले. त्यावर स्मिता पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवारांच्या वक्तव्याने खूप वाईट वाटलं. दादांनी आबांच्या पश्चात आमचं पालकत्व स्वीकारलं होतं. साडेनऊ वर्षानंतर आबांविषयी अजितदादा ही खदखद व्यक्त करतायत. याच वाईट वाटतंय. दुसरं कोणी बोललं असतं तर वाईट वाटलं नसतं. पण अजितदादा आमच्यासाठी वडीलधारे आहेत. त्यांच्याकडून अशी अपेक्षा नव्हती, असं स्मिता पाटील यांनी म्हटलं आहे.