दीपक खिलारे / इंदापूर : महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर ते करमाळा या पाणलोट क्षेत्रातील पुलासाठी ३८४ कोटी रुपयांची तरतूद नंतर ही करता आली असती. असं वक्तव्य केल्याने पाणलोट क्षेत्रातील नेते व ग्रामस्थांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
हर्षवर्धन पाटील यांच्या वक्तव्यामुळे इंदापूर शहरातील समस्त व्यापारी वर्ग तसेच उजनी धरण पाणलोट क्षेत्रातील नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ते लोण मतदारांपर्यंत पोहोचण्याची चिन्हे दिसत असल्याने शहरातील व्यापारी मतदार, पाणलोट क्षेत्रातील ग्रामस्थ मतदार व हर्षवर्धन पाटील यांच्या मतांमधील पूल कोसळून पाडणार का? अशी आशंका निर्माण झाल्याचे चित्र दिसू लागले आहे.
२८ फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इंदापूर शहर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष भरत शहा व मुकुंद शहा यांची सदिच्छा भेट घेतली होती. त्या वेळी भरत शहा यांनी इंदापूर शहर व्यापारी संघाच्या वतीने भीमा नदीवर शिरसोडी कुगाव हा पूल बांधावा, या व इतर मागण्यांचे निवेदन पवार यांना दिले होते.
दरम्यान, अजित पवार यांनी पुलाचे काम निश्चितपणे मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर वेगाने सूत्रे हलवून त्या पुलासाठी ३८४ कोटी रुपये मंजूर केले. त्याची घोषणा ६ एप्रिल रोजी झालेल्या जाहीर सभेत त्यांनी करुन ही टाकली. विशेष म्हणजे या कामासाठी पाठपुरावा करणारे आमदार दत्तात्रय भरणे व आत्ता शरद पवार गटाचे गटाचे विधानसभेचे उमेदवार असणारे हर्षवर्धन पाटील व्यासपीठावरच होते.
त्या वेळी व शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळेपर्यंत अजित पवार यांच्या त्या निर्णयाबाबत चकार शब्द ही न बोलणा-या हर्षवर्धन पाटील यांनी त्यांची उमेदवारी दाखल करण्याच्या दिवशी या पुलासाठी आत्ताच इतका निधी देण्याची गरज नव्हती. हे काम नंतर ही करता आले असते, असे वक्तव्य केले. या वक्तव्याच्या विरोधात व्यापारी वर्गाच्या प्रतिकूल प्रतिक्रिया उमटल्या. हा वर्ग न बोलता वाद न घालता कृती करतो, त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांनी बहुतांश व्यापारी वर्गाची मते गमावल्याची चर्चा होत आहे.
अशातच आता आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब व्यवहारे, तालुका उपाध्यक्ष नानासाहेब नरुटे व महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष संजय सोनवणे यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. त्यामुळे पाणलोट क्षेत्रातील मते ही हर्षवर्धन पाटील यांच्यापासून दूर जातात की काय? अशी स्थिती उद्भवली आहे.
बाळासाहेब व्यवहारे म्हणाले की, व्यापारी संघटनेच्या एका अर्जामुळे अजित पवार व आमदार दत्तात्रय भरणे यांनी ३८४ कोटी रुपये खर्चाच्या पुलाच्या कामाला मंजूरी दिली. इंदापूर व करमाळा तालुके जोडण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम केल्याबद्दल आम्ही दत्तात्रय भरणे यांचे आभार मानतो. मात्र, एवढे मोठे काम होऊन देखील हर्षवर्धन पाटलांनी त्या पुलाची आता काय गरज होती, तो पूल झाला नसता तर काय बिघडल असतं, असं जाहीर सभेत वक्तव्य केलं. या वक्तव्याचा पाणलोट क्षेत्रातील सर्व गावातील शेतकरी त्यांचा जाहीर निषेध करतो.
नानासाहेब नरुटे म्हणाले की, मागील काळात पाणलोट क्षेत्रात बोट बुडून जी दुर्देवी घटना घडली होती. तिच्या पार्श्वभूमीवर पूल होणे आवश्यकच होते. तो करण्याचा निर्णय अजित पवार व आमदार भरणे यांनी घेतला. तो पूल काही विदर्भात का मराठवाड्यात बांधलेला नाही. इंदापूर तालुक्यातील लोकांसाठीच बांधण्यात येणार आहे. त्या बाबत संकुचित वृत्तीने वक्तव्य करणाऱ्या हर्षवर्धन पाटील यांचा ग्रामस्थांच्या वतीने आम्ही तीव्र निषेध करत आहोत.
संजय सोनवणे म्हणाले की, अजित पवार आणि आमदार दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नातून हा जो पूल मंजूर झाला आहे. त्याच्यामुळे इंदापूर व करमाळा तालुक्यातील अंतर ७० ते ८० किलोमीटरने कमी होणार आहे. दोन्ही तालुक्यातील पाणलोट क्षेत्रातील ७० पेक्षा जास्त गावांमधील दळणवळण वाढणार आहे. चांगल्या आरोग्य सुविधा लाभणार आहेत. परंतु, अशा पद्धतीने चुकीचे वक्तव्य करुन लोकांमध्ये चुकीचा संदेश कोणी पसरवण्याचे कोणी काम करत असेल तर त्याचा प्रथमतः आम्ही जाहीर निषेध करतो. चांगल्या कामांना चांगल म्हणण्याचे धाडस आपल्यात असले पाहिजे. फक्त टीकेसाठी टीका करणे चालणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.