अक्षय टेमगिरे
रांजणगाव : रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे कारेगावचे हद्दीमध्ये जुलै 2024 रोजी पाच ते सहा जणांच्या टोळक्यांनी बेकायदेशीर गर्दी जमवत महिला फिर्यादी व त्यांचा मुलगा यांना जुन्या भांडणाच्या कारणावरुन हाताने व दगडाने मारहाण केल्या प्रकरणी दोन फरार आरोपींना रांजणगाव एमआयडीसी पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
सदर गुन्ह्यातील काही आरोपींना गुन्हा घडल्यानंतर अटक करण्यात आली होती. परंतु आरोपी प्रथमेश उर्फ बच्चा संतोष नवले, सनी परमेश्वर मस्के दोन्ही (रा. कारेगाव, ता. शिरूर, जि. पुणे) हे गुन्हा घडल्यापासुन फरार होते.
सदर फरार आरोपींचा पोलीस शोध घेवुनही गेल्या तीन महिन्यांपासुन मिळून येत नव्हते. आगामी विधानसभा निवडणुक 2024 चे अनुषंगाने निवडणुक प्रक्रिया शांततेमध्ये व भयमुक्त वातावरणात पार पाडण्याकरीता पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण यांनी गुन्ह्यातील पाहिजे व फारारी आरोपीतांचा शोध घेवुन त्यांना गुन्ह्याचे कामी अटक करण्याबाबत आदेश दिलेले आहेत.
दि. 27ऑक्टोबर रोजी रात्री नाईट राऊंड दरम्यान पोलीस उपनिरीक्षक अनिल चव्हाण, पो.कॉ. उमेश कुतवळ व चा.पो.हवा. माऊली शिंदे यांनी रेकॉर्डवरील पाहिजे असलेल्या फरार आरोपीचा शोध घेत असतांना पो.कॉ. उमेश कुंतवळ यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेतला असता रांजणगाव पो.स्टे. गुन्ह्यातील फरार आरोपी प्रथमेश उर्फ बच्चा संतोष नवले वय 21 वर्षे, सनी परमेश्वर मस्के वय 19, या दोघा आरोपींना अटक करण्यात आली आहे.
आरोपी प्रथमेश उर्फ बच्चा संतोष नवले हा सराईत गुन्हेगार असुन त्याचेविरुध्द आर्म अॅक्ट तसेच इतरही गुन्हे दाखल आहेत. सदर आरोपीविरुध्द तडीपारीचा प्रस्ताव सादर करण्यात आलेला असुन त्याला लवकरच पुणे जिल्ह्यातुन तडीपारीचा आदेश काढण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी दिली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील अधिक तपास पो.हवा. कल्पेश राखोंडे हे करत आहेत.