पुणे : पुणे शहरातील बेशिस्त दुचाकीस्वार सायलेन्सरद्वारे फटाके फोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करून दुचाकींचे सायलेन्सर जप्ती करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी वाहतूक विभागासह पोलिस ठाण्यांना दिले आहेत. तसेच अशाप्रकारे सायलेन्स बसविणाऱ्या गॅरेज चालकांची यादी बनविण्यात आली असून त्यांच्याविरूद्धही कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याचे गुप्ता यांनी सांगितले आहे.
पुणे शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकींचे सायलेन्स मॉडीफाईड करण्यात येत आहेत. हातातील बटण दाबताक्षणी फटाक्यांचा आवाज काढण्यात येत आहे. त्याद्वारे मोठमोठ्या आवाजाने बेशिस्तांकडून शेजारील वाहन चालकांसह परिसरातील नागरिकांना मानसिक त्रास दिला जात आहे.
तसेच शाळा-महाविद्यालये, रूग्णालय, नोहॉर्न झोन परिसरात ध्वनी प्रदुषण वाढले आहे. अशा बेशिस्त चालकांवर कारवाई होणार आहे. त्यामुळे विविध रस्त्यांवर सायलेन्सद्वारे फटाके फोडणाऱ्यांना लवकरच चाप बसणार आहे.
विशेषत: बुलेटस्वार तरुणांकडून इंदूरी सायलेन्सरमधून फटाक्यांचा आवाज काढून रस्त्यांसोबतच गल्लीबोळात दुचाकी दामटल्या जात आहेत. परिसरात दहशत माजविण्यासाठी काही जणांचे टोळके रात्री-अपरात्री दुचाकींच्या फेऱ्या मारत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे सायलेन्सरद्वारे आवाज काढीत दुचाकी दामटणाऱ्यांविरूद्ध आता विशेष ड्राईव्ह घेण्यास सुरूवात झाली आहे.
दुचाकींचा आवाज वाढविण्यासाठी इंदोरी सायलेन्सर बसविले जातात. गॅरेज चालकांकडून बुलेट धारकांच्या वाहनांना सायलेन्सर बदल केला जात आहे. त्यासोबत काही विक्रेत्यांकडूनही आवाजाचे सायलेन्सर विक्री केले जात असल्याचे दिसून आले आहे.
त्यामुळे सायलेन्सरच्या आवाजासाठी फेरबदल करणारे गॅरेजवाले आणि विक्रेत्यांची पोलिस ठाणे स्तरावर यादी बनविण्यात आली असून आता त्यांच्या विरोधातही कारवाई करण्यात येणार आहे. तसेच अजून काही गॅरेजवाले आणि विक्रेते असतील तर नागरिकांनी त्यांची माहिती पोलिसांना द्यावे. असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
याबाबत बोलताना पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता म्हणाले कि, ध्वनीप्रदुषणद्वारे नागरिकांना मनस्ताप देणाऱ्यांविरूद्ध कारवाई करण्यात येत आहे.
विशेषतः रात्री दहानंतर हॉटेल, पबमध्ये वाजविले जाणारे साउंड, उशिरापर्यंत सुरू असलेली बांधकामे, दुचाकी सायलेन्सद्वारे आवाज काढणाऱ्याविरूद्ध कारवाईस सुरूवात केली आहे.