पुणे : कर्नाटकमधून पुण्यात पाठवण्यात आलेला सुमारे एक कोटी रुपयांचा गुटखा पोलिसांनी रविवारी (दि. २७) पहाटे खेड शिवापूरजवळ ताब्यात घेतला. यासंदर्भात गुटख्याची बेकायदा विक्री करणाऱ्या दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
खेड शिवापूर टोलनाका परिसरात ग्रामीण पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली. मल्लमा भीमाया दौडमनी (वय ३१, सध्या रा. कात्रज; मूळ, रा. मदगुनकी, कर्नाटक) व तुषार दीपक घोरपडे (वय २६, रा. जांभूळवाडी, हवेली) ही अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांचे साथीदार स्वप्नील भालशंकर व बबलू पाटील यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका टेम्पोतून हा गुटखा कर्नाटक येथून पुण्यामध्ये आणला जात होता. त्यापूर्वीच राजगड पोलिसांनी रविवारी पहाटे पाचच्या सुमारास शिवापूर टोलनाका परिसरातील शिवरे गावाच्या हद्दीत हा टेम्पो अडवून तब्बल १ कोटी १५ लाख ८८ हजारांचा गुटखा जप्त केला. यासंदर्भात राजगड पोलीस ठाण्यातील कर्मचारी अक्षय सुभाष नलावडे यांनी फिर्याद नोंदवली आहे.
राज्यामध्ये गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू व इतर पदार्थाच्या विक्री व वापरास प्रतिबंध करण्यात आलेला आहे. या प्रतिबंधित पदार्थाच्या बंदीची अंमलबजावणी अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत पोलीस विभागाच्या साहाय्याने करण्यात येते. मात्र, प्रत्यक्षात पुण्यात गुटखाबंदी ही कागदावरच असल्याचे स्पष्ट झाले आहे.