दौंड : गेली महिनाभरापासून दौंड विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून कोणाला संधी मिळणार यावरून मोठे घमासान सुरू होते. आज अखेर यावर तोडगा निघाला असून माजी आमदार रमेश थोरात यांना राष्ट्रवादी काँगेसमध्ये प्रवेश देऊन लगेच त्यांना ए बी फॉर्म दिला. त्यानंतर दौंड मतदार संघातून रमेश थोरात यांनी सोमवारी जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
माजी आमदार रमेश थोरात यांनी दौंड शहरामध्ये छत्रपती शाहू महाराज स्मारक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत रॅली काढली. तसेच त्यांनी शेवटी दौंड चौक मध्ये सभा घेऊन जोरदार शक्तीप्रदर्शन केले.
यावेळी रमेश थोरात म्हणाले की, आगामी काळात शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असून मागील 40वर्षा प्रमाणे पुढेही या दौंडच्या जनतचे प्रामाणिकपणे काम करणार आहे. तसेच आमच्या पक्षातील इतर इच्छुक उमेदवारांनीही पाठिंबा दिला असून तालुका अध्यक्ष अप्पासाहेब पवार हेही येत्या दोन दिवसात प्रचारामध्ये सहभागी होतील. आजपर्यंतच्या एवढ्या निवडणुका पार पडल्या पण आजच्या इतकी गर्दी कधीही जमली नव्हती, यावरून जनतेचे प्रेम हे दिसून येत आहे.
पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बहुचर्चित भागापैकी एक दौंड मतदार संघ येतो. कुरकुंभ एमआयडीसी तसेच मोठ्या प्रमाणात ऊस शेती तसेच चार साखर कारखान्यामुळे विकसीत परिसर असलेल्या या दौंड मध्ये शहरी तसेच ग्रामीण असा परिसर आहे. माजी आमदार राहिलेले रमेश थोरात यांना यावेळी शरद पवार यांच्या पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. रमेश थोरात यांची गेली 40वर्षापासून पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून मतदारसंघात पकड आहे.
त्यांचा खुटबाव गावचे सरपंच ते दौंड चे आमदार असा प्रवास राहिलेला आहे. तसेच त्यांनी अनेक वर्ष पुणे जिल्हा मधयवर्ती बँकेचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. व सध्या ते बँकेत विद्यमान संचालक ही आहेत. आता पाचव्यांदा ते निवडणुकीला सामोरे जात असून भाजपाचे विद्यमान आमदार राहुल कुल यांच्यासोबत त्यांचा सामना होणार आहे. विद्यमान व माजी आमदार असा हा सामना दौंडमध्ये रंगला जाणार आहे. त्यामुळे कोण बाजी मारणार हेदेखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे.