वेल्हे : सिंहगडावर फिरण्यासाठी आलेल्या ६० वर्षीय पर्यटकाचा किल्ल्याच्या कल्याण दरवाजालगतच्या अतिदुर्गम झुंजार बुरुजावरून ३०० फूट खोल दरीत कोसळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना रविवारी (दि. २७) सकाळी उघडकीस आली. मृताची ओळख पटविण्याचे काम राजगड पोलिस करत आहेत.
नेमकं काय घडलं?
६० वर्षीय पर्यटक हा शनिवारी (दि. २६) सिंहगडावर फिरण्यासाठी आला होता. तो सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास झुंजार बुरुजावरून खोल दरीत कोसळल्याचे गडावरील काही विक्रेत्यांनी पाहिले. मात्र, पोलिसांच्या भीतीमुळे याची खबर कोणाला दिली नाही. रविवारी सकाळी एक पर्यटक दरीत पडल्याची माहिती वन विभागाला मिळाली.
त्यानुसार सिंहगड वन विभागाचे वनपरिमंडल अधिकारी समाधान पाटील यांच्यासह कर्मचारी, सुरक्षारक्षक आणि राजगड, हवेली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सुरक्षारक्षक श्रीकांत लांघे, हर्षद गायकवाड, दीपक जोरकर, स्वप्निल सांवरे, दत्ता जोरकर, सुमीत रांजणे, राहुल जोरकर, नंदू जोरकर, रमेश खामकर, संतोष पढेर, घेरा सिंहगडचे माजी उपसरपंच अमोल पढेर, मावळा जवान संघटनेचे तानाजी भोसले, हवेली रेस्क्यू पथकाचे गणेश सपकाळ, संदीप सोळसकर, सागर बावळे, संजय चोरघे, संजय कडू पाटील, मनोज शिंदे, प्रतीक महामुनी यांनी खोल दरीतून पर्यटकाचा मृतदेह बाहेर काढला.
त्यानंतर हवेली पोलिस ठाण्याचे हवालदार संतोष तोडकर, साळुंखे आदींनी मृतदेह गडाच्या वाहनतळावर आणला. घटनास्थळ राजगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत असल्याने मृतदेह राजगड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे. राजगड पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविला आहे.
दरम्यान, दुर्गम बुरुजावरून खोल दरीत कोसळून त्याचा जागीच मृत्यू झाला असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. मात्र, शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच नेमका कधी व कोणत्या कारणाने मृत्यू झाला, हे स्पष्ट होईल. त्याच्या अंगावर पांढरा शर्ट व तपकिरी रंगाची पॅन्ट असून, हातात घड्याळ आहे, असे पोलिसांनी सांगितले आहे.