उरुळी कांचन, (पुणे) : चिमुरड्यांपासून ज्येष्ठांपर्यंत आकर्षण असलेल्या दीपोत्सावाला आजपासून (दि. 28) प्रारंभ होत आहे. त्यामुळे घराघरांत आनंदोत्सवाची लगबग सुरू झाली आहे. अंगणी सडा, त्यावर रंगीबेरंगी रांगोळ्या अन् भोवती पणत्याचा झगमगाट, वैविध्यपूर्ण आकाश कंदिलांचा रंगीत प्रकाश सर्वत्र दिसून येत आहे. सोमवारी सायंकाळी गोमाता व वासरू यांचे मनोभावे पूजन करण्यात आले.
सोमवारी दुपारपासून या उत्सवाची तयारी घरोघरी सुरू झाली. घरासमोरील मोकळ्या जागेत रांगोळ्या काढण्यात आल्या. संध्याकाळी देवघरातील समया लावण्यात आल्या होत्या. तसेच घरभर चैतन्य बहरले होते. नवीन कपड्यांचे रंगही त्यात मिसळले. हिंदू धर्मात गाईला महत्त्व आहे, तिच्या प्रती आदर म्हणून पूजा केली जाते. ज्यांच्या घरी गाय-वासरू उपलब्ध आहे, त्यांनी त्यांचे पूजन करून गोमातेच्या पायावर पाणी आणि हार फुलांनी पूजा केली. ज्यांच्याकडे गाई नाहीत त्यांनी मातीच्या बनविलेल्या प्रतिकृतीचे मनोभावे पूजन केले.
दरम्यान, प्रत्येक घरातील खिडक्या, बाल्कनीमध्ये पणत्यांमधील दीपज्योती, आकर्षक विद्युत रोषणाई आणि दिवाळी सणाची ओळख असलेले विविध आकारांचे आकाश कंदीलही लक्ष वेधून घेत होते. पूर्व हवेलीतील पुणे – सोलापूर महामार्गाच्या बाजूला असलेल्या कपडे बाजारपेठेतही नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. त्यामुळे रस्तेही वाहनांनी भरले होते.
वसुबारस पुजनाने दिवाळीला महत्व असते, अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या बाराव्या प्रकाश दिवशी वसुबारस साजरा केला जातो. वसु म्हणजे गाय आणि बारस म्हणजे बारावा दिवस असे, या शब्दाचे प्रचलित आहे. शेतकऱ्यांच्या दारी गायीला महत्व आहे. वसुबारस पुजनाने घरात नवचैतन्य प्रकाशमय वातावरण निर्माण होते. नवीन पिढीला याबाबत कल्पना यावी, हा वसुबारस पुजनामागील उद्देश आहे.
संभाजी कांचन (गडकरी), शेतकरी, उरुळी कांचन, (ता. हवेली)