पुणे : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आज दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली आहे. रासने यांना उमेदवारी जाहीर होताच भाजपचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी सोशल मिडिया या प्लॅटफॉर्मवर आपली नाराजी व्यक्त केली आहे.
पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे फेसबुकवर आपली नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, ‘तुम्हाला हिंदूत्ववादी सरकार हवंय, पण ३० वर्षे हिंदूत्वासाठी देणारा कार्यकर्ता उमेदवार म्हणून नकोय’, असं म्हणत धीरज घाटे यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान, कसबा विधानसभेच्या जागेसाठी पुण्यातील भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी ८ ऑक्टोबर रोजी मुंबईमध्ये पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली होती. यावेळी धीरज घाटे यांच्या उमेदवारीची मागणी करण्यात आली. पोट निवडणुकीत हातातून निसटलेला आपला पारंपरिक मतदारसंघ भाजपा पुन्हा एकदा खेचून आणू शकतो, असा विश्वास या कार्यकर्त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोर बोलून दाखवला होता. त्यामुळे धीरज घाटे देखील विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक होते. अखेर त्यांनी आपली खदखद बोलून दाखवली आहे.