पुणे : राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली असून वाहनांची तपासणी केली जात आहे. तसेच भरारी पथके देखील तैनात करण्यात आली आहेत. नाकाबंदीदरम्यान, आज शहरातील सहकार नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुणे पोलिसांच्या नाकाबंदीत 138 कोटींचे सोने पकडले आहे. आज सकाळच्या सुमारास सातारा रस्त्यावर नाकाबंदी पोलिसांनी ही कारवाई करत कोट्यवधीचे सोने जप्त केले आहे. चौकशीअंती हे सोनं बेकायदा नसून एका सोने डिलिव्हरी करणाऱ्या कंपनीचे असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास तपासणीवेळी हा टेम्पो अडवला. त्यामध्ये पांढऱ्या पोत्यात बॉक्स आढळले, या टेम्पोत चालक आणि आणखी एक जण होता. त्यांच्याकडे चौकशी केली, त्यांची तपासणी अद्याप सुरु आहे. हे जवळपास १३८ कोटी रूपयांचं सोनं असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, सहकार नगर परिसरातून ताब्यात घेतलेला हा टेम्पो एका खासगी लॉजिस्टिक कंपनीचा असून यामधील सोनं पुण्यातील कुठल्या व्यापाऱ्याकडे जात होतं, याचा तपास सध्या सुरू आहे. पोलिसांनी या संदर्भात सर्व माहिती आयकर विभाग तसेच निवडणूक आयोगाला कळवली आहे. पुण्यातील सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयात हा टेम्पो सध्या आणलेला आहे, अशी माहिती पुण्यातील डीसीपी स्मार्तना पाटील यांनी दिली आहे.
पुढे डीसीपी स्मार्तना पाटील म्हणाल्या कि, पोलिसांकडून सध्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाकाबंदी व 24 तास तपासण्या केल्या जात आहेत. त्यानुसार, आज सकाळी तपासणी दरम्यान, आढळून आलेल्या टेम्पोची तपासणी करण्यात आली आहे. त्यामध्ये पांढरे बॉक्स होते, या बॉक्समध्ये काहीतरी असल्याचे लक्षात येताच चालकाकडे अधिक चौकशी केली. त्यामध्ये दागिने असून मुंबईतून ते पुण्याच्या कार्यालयात आणले आहेत. त्यामुळे आपण आयकर विभाग आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देऊन पुढील चौकशीसाठी त्यांनाही बोलवले आहे, असं डीसीपी स्मार्तना पाटील यांनी सांगितले.