शिक्रापूर: विधानसभा निवडणूका शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक कालावधीमध्ये आचारसंहिता लागू झाल्यानंतर पुणे जिल्ह्यातील शस्र परवाना धारकांचे शस्त्र जवळील पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यानुसार शिरुर तालुक्यातील ४४२ शस्रे जमा करण्याचे आदेश देखील जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत.
विधानसभा मतदार संघात निवडणूक कालावधीमध्ये शस्र अथवा हत्यारे, दारुगोळा यांचा गैरवापर होऊन कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि मानवी जीवित हानी किंवा सुरक्षितेला व मालमत्तेला धोका पोहचू नये. तसेच सार्वजनिक शांतता बिघडून दंगा होऊ नये या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.
पुणे जिल्ह्यातील ३३ पोलीस स्टेशन हद्दीतील तब्बल ३ हजार ६७७ शस्र परवाना धारकांकडील शस्रे जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत. शिरुर तालुक्यातील ४४२ शस्रे जमा करण्याचे आदेश दिलेले असून यामध्ये शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीतील ११९, शिरुर पोलीस स्टेशन हद्दीतील २७३, तर रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील ५० शस्र परवाना धारकांना त्यांच्या जवळील शस्रे पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्याचे आदेश देत आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय न्याय संहितामधील कलम २२३ मधील तरतूदीनुसार कारवाईस पात्र असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी म्हटले आहे.