उरुळी कांचन, (पुणे) : मुळा मुठा नदीच्या ठिकाणी असलेल्या कोरेगाव मूळ (ता. हवेली) येथील स्मशानभूमीत पावसाळ्यात सर्वत्र ठिकाणी गवत वाढून सुकून गेले होते. त्याचबरोबर या स्मशानभूमीच्या सभोवताली झाडी, झुडपी तसेच कचरा पडला होता. या स्मशानभूमीची स्वच्छता व स्मशानभूमीत सर्व ठिकाणी लाईट लावण्यात आल्या आहेत. कोरेगाव मूळचे सरपंच भानुदास जेधे यांनी केलेल्या कामाचे परिसरातुन कौतुक केले जात आहे.
कोरेगाव मूळ स्मशानभूमीत नागरिकांना आवश्यक असलेल्या पाण्याचा हापसा मागील अनेक दिवसांपासून बंद होता. स्मशानभूमीत लाईटची सोय नसल्याने अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत होती. काही दिवसांपूर्वी स्मशानभूमीची दुरूस्ती व्हावी, यासाठी काही नागरिकांनी सरपंच जेधे यांच्याकडे मागणी केली होती. त्यानुसार कायमस्वरुपाची लाईट स्मशानभूमीत बसविण्यात आली आहे.
सरपंच भानुदास जेधे यांनी तात्काळ दुरुस्ती करून हा हापसा व कायमस्वरूपी स्मशानभूमीत लाईटची सोय करण्यात आली आहे. यावेळी माजी सरपंच मंगेश कानकाटे, उपसरपंच अश्विनी कड, ग्रामपंचायतीचे कर्मचारी व काही नागरिक उपस्थित होते.
दरम्यान, स्मशानभूमीत पडलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या, झाडांची पाने व फांद्या काढून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. समाजातील घटकांनी सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवून ग्रामपंचायतीला सहकार्य करावे, असे आवाहन सरपंच जेधे यांनी केले आहे.