पुणे : विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवारांची यादी जाहीर केली जात आहे. यामध्ये आता मराठा क्रांती मोर्चा देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. मराठा क्रांती मोर्चा ठाण्यातील चार विधानसभा जागांवर उमेदवार उतरवणार आहे. त्याच बरोबर मराठा क्रांती मोर्चाने पुण्यात मराठा उमेदवार देण्याची तयारी सुरू केली आहे. मराठा क्रांती मोर्चाने ठराव करून खडकवासला विधानसभा मतदारसंघातून दीपक मानकर यांनी निवडणूक लढवावी असा ठराव केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातून मराठा समाजाचा उमेदवार देण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाने मंगळवारी एक बैठक आयोजित केली होती. खडकवासला विधानसभा मतदारसंघातून दीपक मानकर यांनी निवडणूक लढवावी असा ठराव या बैठकीमध्ये पारित करण्यात आला. मराठा क्रांती मोर्चाने पाठिंबा देत एक मताने हा ठराव केला आहे.
नुकत्याच झालेल्या सकल मराठा आणि मराठ क्रांती मोर्चाच्या बैठकीत एकमताने ठराव करून मराठा उमेदवार देण्याची तयारी पुण्यातून सुरू आहे. दीपक मानकर हे राज्यपाल नियुक्त आमदारकी न मिळाल्याने नाराज आहेत. अशात पुणे मराठा क्रांती मोर्चाने त्यांना मराठा उमेदवार म्हणून खडकवासला विधानसभेतून निवडणूक लढवण्याचा ठराव केला आहे. तसेच दीपक मानकर यांना हा प्रस्ताव देण्यात आला आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जरांगे फॅक्टर आणि मराठा समाज याचा फटका अनेक सत्ताधारी उमेदवारांना बसला होता. विरोधकांना फायदा झाल्याचा दावाही यावेळी मोठ्या प्रमाणात करण्यात आला होता. आता विधानसभेला मराठा समाजाच्या मतांना मोठं महत्व आलं आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांकडून सावध भूमिका घेतली जात आहे. त्यातच आता मराठा क्रांती मोर्चाने आपला उमेदवार उतरवण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीचे टेन्शन वाढणार आहे.