पिंपरी : पिंपरी- चिंचवड परिसरातून एक अपघाताची बातमी समोर आली आहे. अल्पवयीन मुलाने भरधाव वेगाने टेम्पो चालवून दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील १२ वर्षाच्या मुलाचा मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. ही घटना रविवारी २० ऑक्टोबर रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास भोसरी एम.आय.डी.सी.पोलीस ठाण्यासमोर घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन मुलासह टेम्पो चालविण्यास देणार्या टेम्पोमालकावर गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी लांडेवाडी येथील एका महिलेने भोसरी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. श्रीनिवास थोरात (रा. राजवाडा, इंद्रायणीनगर, भोसरी) असे टेम्पो मालकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या त्यांच्या दोन्ही मुलांना क्लास सुटल्यावर इंद्रायणीनगर येथे त्यांच्या दुचाकीवरुन घरी जात होत्या. भोसरी पोलीस ठाण्याच्या समोरील चौकातून उजवीकडे पी सी एन डी टी सर्कलच्या दिशेने पोलीस ठाण्यासमोरुन जात होत्या. त्यावेळी संत नगर चौकाकडून सर्व्हिस रोडने अल्पवयीन मुलाने तीन चाकी टेम्पो भरधाव वेगाने येऊन फिर्यादी यांच्या दुचाकीला धडक दिली.
दरम्यान, या अपघातात त्यांचा १२ वर्षाच्या मुलाचा मृत्यु झाला आहे. तसेच त्याची बहिण गंभीर जखमी झाली आहे. टेम्पो मालक श्रीनिवास याने मुलगा अल्पवयीन असल्याचे माहिती असताना देखील त्याच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना नसतानाही त्याला तीन चाकी टेम्पो चालविण्यास दिला. त्यामुळे हा अपघात झाल्याने मुलासह टेम्पोमालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चिट्टमपल्ले करीत आहेत.