पुणे : पुण्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. पुण्यात विस्तारा एअरलाईन्सच्या सहा वेगवेगळ्या विमानात बॉम्ब ठेवणार असल्याचं ट्विट करण्यात आले आहे. या ट्विटच्या माध्यमातून दहशत पसरवण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे. विमान नगर पोलीस ठाण्यात ट्विट करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत. मात्र, या ट्विटमुळे राज्यासह पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.
सिझोफेनिया 111 (schizophrenia111 @schizophreniqqq) असं गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ट्विटर अकाऊंट वापरकर्त्याचे नाव आहे. हा धक्कादायक प्रकार सिंगापूर ते पुणे विमान प्रवासादरम्यान ट्विटरद्वारे रविवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, स्किझोफेर्निया या ट्विटर अकाऊंटवरून अज्ञात व्यक्तीने हे ट्विट केले होते. मेसेजमध्ये 12 जण विमानात असून त्यापैकी 6 जण तुमच्या विमानात बॉम्बसह आहेत. फ्लाईट यु के 24, फ्लाईट यु के 106, फ्लाईट युके 146, फ्लाईट युके 116, फ्लाईट युके 110, फ्लाईट युके 107 (प्रत्येकी 2 जण) सर्व जण संपणार आहेत.
असा मेसेज मिळाला आहे. तर एअरपोर्ट परिसरातील नागरिक आणि प्रवाशांमध्ये खोटी माहिती आणि अफवा पसरवून भितीदायक वातावरण निर्माण केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. दरम्यान, या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल केला असून दहशत पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.