लोणी काळभोर, (पुणे) : शाळेतून घरी घेऊन जात असताना एका महिलेला रस्त्यात आडवून तिचा विनयभंग करून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार थेऊर-कोलवडी रोडवर कल्पतरु बागे समोर शनिवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुदाम बाबुराव गावडे (वय-५५ वर्षे, रा. थेऊर, ता. हवेली) असं गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका ३० वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला शनिवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास आपल्या मुलीला शाळेतून आणण्यासाठी गाडीवरून जात होती. यावेळी आरोपी सुदाम गावडे याने टेम्पो चालवत पीडित महिलेचा पाठलाग केला. त्यानंतर थेऊर ते कोलवडी रोडवर कल्पतरु बागे समोर महिलेच्या गाडीला टेम्पो आडवा लावून थांबवले.
त्यानंतर आरोपीने पीडितेचा हात धरत “तू मला खूप आवडतेस, तू मला हवी आहेस’, असे म्हणत तिचा विनयभंग केला. पीडितेने हात झटकल्यानंतर त्याने तिचा हात पिरगळुन हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी त्याने पीडितेच्या पोटामध्ये लाथाने मारहाण केली. तसेच केसांना धरून रस्त्यावर खाली पाडले.
‘तू मला कशी हा म्हणत नाही, तेच बघतो’ असं म्हणत पीडितेचे कपडे फाडून तिला विवस्त्र करण्याचा प्रयत्न केला. पीडितेने आरडा-ओरड केल्याने इतर नागरिक जमा झाल्याने पीडितेला शिवीगाळ करुन ‘तुला व तुझ्या नवऱ्याला, मुलींना बघून घेतो, अशी धमकी देवून गावडेने घटनास्थळावरून पळ काढला. त्यानतर पीडितेने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास लोणी काळभोर पोलिस करत आहेत.