मुंबई : विधानसभेच्या निवडणुकीची तारीख जाहीर होताच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. आचारसंहिता लागायच्या आधी मराठ्यांना आरक्षण मिळेल अशी आशा होती, मात्र देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांचा कार्यक्रम केला. आता विधानसभेत त्यांची जिरवायचीच, लोकसभेपेक्षा जास्त ताकद दाखवा, असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केलं आहे. तसेच आता कुणाच्या जागा वाढवायच्या आणि कुणाच्या कमी करायच्या हे आम्ही ठरवू, असा इशारा देखील मनोज जरांगे यांनी यावेळी दिला आहे.
काय म्हणाले मनोज जरांगे?
मराठ्यांना बेदखल करण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. कष्टकरी, कामगार, शेतकरी यांना जी अपेक्षा होती, ती आशा सरकारने संपवली आहे. मराठ्यांचं आयुष्य बेचिराख करण्याचं काम फडणवीस यांनी केलं आहे. फडणवीसांनी सत्तेचा वापर मराठ्यांच्या विरोधात केला आहे, असा आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे.
पुढे बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळू द्यायचं नाही, यासाठीच देवेंद्र फडणवीसांनी सुरुवातीपासून खेळी केलीय. या मराठ्यांची पोरं आरक्षणासापासून, शिक्षणापासून, नोकरीपासून वंचित राहीले पाहिजेत, अशा पद्धतीने फडणवीस मराठा समाजासोबत वागलेत. सामाजिक चळवळीत वैचारिक मतभेद असू शकतात, पण मराठा समाज एक ठेवायचा नाही, मराठा समाजाच्या पोरांना आरक्षण न देता भिकारी ठेवण्याचं काम फडणवीस यांनी केलंय. देवेंद्र फडणवीस द्वेषाने वागले. मराठ्यांच्या शेपटावर त्यांनी पाय ठेवला, असंही मनोज जरांगे यावेळी म्हणाले.
पुढे म्हणाले, मराठा समाजाला फडणवीस यांची खुन्नस कळाली होती. आम्ही मराठ्यांना बाजूला ठेऊन सत्तेवर बसू, असं देवेंद्र फडणवीसांनी ठरवलं आहे. देवेंद्र फडणवीस आम्हाला आरक्षण देतील, असा विश्वास आम्ही ठेवला होता. शेवटी त्यांनी बरबटलेले विचार बाहेर आणलेचं. मराठ्यांना बाजूला ठेवण्यासाठी फडणवीस यांनी डाव रचले.
त्यांच्या 17 पिढ्या आल्या तरी मराठ्यांना बाजूला ठेऊन ते सत्तेवर कधीच येऊ शकत नाही. हात जोडून सर्व समाजाला विनंती करतो, आपल्या समाजाला बळ द्यायचं काम करा. यावेळी मराठ्यांचे 100 टक्के मतदान झाले पाहिजे. मराठ्यांचे एकही मतदान घरी राहता कामा नये, असे आवाहन मराठा समाजाला मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे.