पुणे : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. तसेच ज्यांचं वय 85 पेक्षा जास्त आहे त्यांना त्यांच्या घरातूनच मतदान करण्याची सुविधा प्राप्त करून देण्यात येणार असल्याची घोषणा, मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केली आहे.
दिल्लीमधील केंद्रीय विज्ञान भवन या ठिकाणी निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत या तारखा जाहीर केल्या आहेत.
महाराष्ट्रात 1 लाख 186 मतदार केंद्रावर मतदान पार पडणार आहे. ग्रामीण आणि शहरी भागात मतदार केंद्र आहेत. मतदारलाईनमध्ये काही खुर्च्या असतील तशी व्यवस्था सगळ्या मतदार केंद्रावर केली जाणार आहे. तसेच 85 वर्षापेक्षा जास्त वयाच्या मतदाराला घरातून मतदान करण्याची सुविधा प्राप्त केली जाणार आहे. त्यासाठी त्यांना निवडणूक आयोगाचा एक फॉर्म भरावा लागणार आहे. यासोबतच सगळ्या मतदानाची व्हिडिओग्राफी केली जाईल अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिली आहे.
तसेच मुक्त वातावरणात निवडणुका झाल्या पाहिजे अशा सुचना राज्याला दिल्या आहेत सगळ्या पक्षांना समान संधी मिळाली पाहिजे. प्रत्येक चेक पोस्टवर तपासणी करण्यात येईल. सामान्य नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी आम्ही घेणार आहोत. तसेच 2 किलोमीटरच्या आत मतदान केंद्र असेल असेही त्यांनी सांगितले.