मुंबई : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार झाला असून यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या हत्येप्रकरणी मुंबई पोलीसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. हरियाणाचा कर्नेल सिंग आणि उत्तर प्रदेशचा धर्मराज कश्यप अशी आरोपींची नावे आहेत. यातील काही आरोपी हे बिश्नोई गॅंगचे आहेत अशी माहिती समोर आली आहे. दोन्ही आरोपींना पोलीसांनी अटक केली असून त्यांच्या इतर साथीदारांचा शोध घेतला जात आहे.
हत्या नेमकी कशी झाली?
बाबा सिद्दिकी यांच्यावर एकूण तिघानी गोळीबार केला आहे. यातील दोन आरोपींची नावे ही करनैल सिंह आणि धर्मराज कश्यप अशी आहेत. पोलीस तिसऱ्या आरोपीचा शोध घेत आहेत. बाबा सिद्धिकी यांच्यावर गोळीबार करण्यासाठी हे तीनही आरोपी रिक्षाने घटनास्थळी आले होते. तीनही आरोपी बाबा सिद्धिकी याची वाट पहात त्या ठिकाणी थांबले होते. या हत्याप्रकरणात प्रत्यक्ष गोळ्या घालणाऱ्या तिघांव्यतिरिक्त आणखी एका आरोपीचा समावेश असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. हा चौथा आरोपी तिघांना मार्गदर्शन करत होता. पोलिसांना तसा संशय असून त्या दृष्टीने पोलीस तपास करत आहेत. हे आरोपी मागील अनेक दिवसांपासून बाबा सिद्धीकी यांच्यावर पाळत ठेवत होते.
कोण आहे आरोपी कर्नेल सिंग…
या प्रकरणातील आरोपी कर्नेल सिंग बिश्नोई संबंधित असल्यामुळे या प्रकरण वेगळं वळण घेत चाललं आहे. कारण या हत्येप्रकरणातील आरोपी कर्नेल सिंग हा बिश्नोई संपर्कात होता, अशी माहिती एका वृत्ताने दिली आहे. कर्नेल सिंग हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. 2019 मध्ये एका हत्येप्रकरणात अटक करण्यात आली होती. याप्रकरणी तुरुंगात असताना कर्नेल सिंग बिश्नोई गॅंगच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. त्यामुळे बाबा सिद्गीकी यांच्या हत्येमागील बिश्नोई गॅंग कनेक्शन समोर आले आहे.
या हत्येप्रकरणाचा तपास मुंबई गुन्हे शाखा करत आहे. हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, काही व्यावसायिक वैमनस्यातून हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे.