Industrialist Ratan Tata Died : प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं वयाच्या 86 वर्षी निधन झालं. यांच्या निधनाने उद्योगपतींपासून मनोरंजन, राजकारण आणि क्रिडा जगतात शोककळा पसरली आहे. रतन टाटा यांच्यावर आज गुरुवारी (दि.10 ऑक्टोबर) रोजी मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सध्या रतन टाटां यांचे पार्थिव त्यांच्या हलेकाय या राहत्या निवासस्थानी ठेवण्यात आले आहे.
टाटा समूहाने दिलेल्या माहितीनुसार, रतन टाटा यांचे पार्थिव आज दक्षिण मुंबईतील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स लॉनमध्ये सकाळी10 ते दुपारी 4 या वेळेत ठेवण्यात येणार आहे. याठिकाणी लोकांना रतन टाटांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेता येणार आहे. आम्ही सर्वांना विनंती करतो की त्यांनी गेट 3 वरुन एनसीपीए लॉनमध्ये प्रवेश करावा आणि बाहेर जाण्यासाठी गेट 2 चा वापर करावा असेल. एनसीपीच्या आवारात पार्किंगची जागा उपलब्ध नसणार आहे. आज दुपारी 4 वाजता त्यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी वरळी स्मशानभूमी, डॉ.ई मोसेस रोड, वरळी येथील प्रार्थना हॉलमध्ये अंतिम प्रवासाला निघेल, असे टाटा समुहाने निवेदनात म्हटले आहे. त्यानंतर सायंकाळी साडेचार वाजता रतन टाटांच्या पार्थिवावर शासकीय इतमातात पारसी पद्धतीने अंत्यसंस्कार केले जाणार आहे.
महाराष्ट्र सरकारने आज गुरुवारी (ता.10 ऑक्टोबर) रोजी राज्यामध्ये एक दिवसाचा शासकीय दुखवटा पाळण्याची घोषणा केली. या दुखवट्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.