बारामती, (पुणे) : नवरात्रीनिमित्त दांडीयाचा कार्यक्रम सुरु असताना बारामती व परिसरातील तरुणांनी गोंधळ घालून कार्यक्रम बंद पडल्याप्रकरणी 6 जणांवर बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी (ता. 04) सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास चिराग गार्डन बारामती येथे घडली आहे.
अक्षय शांताराम देवकाते (रा. निरावागज ता. बारामती), ओकांर विकास खोत (रा. सिध्देश्वर मंदीराशेजारी, ता. बारामती), अजय दिगंबर नलवडे (रा. बारामती) अजित सुभाष यादव (रा. बारामती), अक्षय मोरे (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) अँड किशोर पवार (पुर्ण नाव माहीत नाही ) रा. वनवेमळा, ता. बारामती) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणांची नावे आहेत. याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यातील हवालदार महेश हरिशचंद्र माने यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिराग गार्डन बारामती येथे नवरात्रनिमित्त दांडीयाचा कार्यक्रम सुरु होता. यावेळी वरील सर्वजण त्याठीकाणी आले व कार्यक्रमात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. तसेच दंगा घालुन कार्यक्रम बंद करण्याचा प्रयत्न करुन दहशत निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास बारामती शहर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस उपनिरीक्षक दुधे करीत आहेत.