पुणे : जेजुरीच्या खंडोबा गडावर वेदमंत्राच्या घोषात करवीर पीठाचे शंकराचार्य श्री विद्यानृसिंहभारती यांच्या आज (ता. २५) हस्ते घटस्थापना करून चंपाषष्ठी उत्सवाला सुरुवात करण्यात आली.
सकाळी अकरा वाजता घटस्थापनेसाठी मुख्य मंदिरातील उत्सवमूर्ती पाकाळणी, पूजा-अभिषेक झाल्यानंतर सनई-चौघड्याच्या वाद्यांमध्ये नवरात्र महालात आणण्यात आल्या आहेत.
तसेच यावेळी सदानंदाचा येळकोट असा जयघोष करीत भंडाऱ्याची मुक्त उधळण देखील करण्यात आली. नवरात्र महालात धार्मिक वातावरणात खंडोबा-म्हाळसा देवीच्या मूर्तीची घटस्थापना करण्यात आली.
जयमल्हार चंपाषष्ठी अन्नछत्र प्रतिष्ठान यांच्यावतीने सहा दिवस महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी वेदमूर्ती शशिकांत सेवेकरी व प्रसाद खाडे यांनी पौरोहित्य केले. पुजारी गणेश आगलावे, चेतन सातभाई, बाळकृष्ण दिडभाई, मल्हार बारभाई, अनिल आगलावे, बापू सातभाई, अतुल मोरे, हनुमंत लांघी, सतीश कदम, देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त तुषार सहाणे, विश्वस्त राजकुमार लोढा, पंकज निकुडे-पाटील, संदीप जगताप, शिवराज झगडे, मुख्याधिकारी राजेंद्र जगताप, अधिकारी संतोष खोमणे, गणेश डीखळे, माजी विश्वस्त डॉ. प्रसाद खंडागळे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.