-संदिप टूले
केडगाव : ग्रामीण भागाचे झपाट्याने होणारे शहरीकरण, घटणाऱ्या शेतीक्षेत्राबरोबरच शेतीत आधुनिकीकरण आल्यानंतर बैलांची संख्या झपाट्याने कमी होत गेली. ग्रामीण भागातील बहुतांश शेतकर्यांकडील बैलजोडी आता नाहीशीच झाली आहे. त्यामुळे बैलांविनाच बैलपोळा साजरा करण्याची वेळ आता शेतकर्यांवर आली असून काही शेतकरी बैलाची पूजा करण्यासाठी बाजारातून कृत्रिमरित्या तयार केलेल्या बैलांची मुर्ती खरेदी करुन त्यांची पूजा करत आहेत.
दौंड तालुक्यातील अनेक ठिकाणी बुधवारी (ता. 3) बैलपोळा साजरा करण्यात आला. यामध्ये एकेरीवाडी गावात अवघ्या तीन ते चार बैलजोड्यांत पोळा साजरा करण्याची वेळ आली आहे. पूर्वी याच गावातून सरासरी 100 ते 150 बैलजोड्यांचा बैलपोळा साजरा होत तसेच पूर्वी बैल जोडी सजवण्याचा जणू स्पर्धाच लागायच्या या निमित्ताने वाडी वस्तीवरील लोक आपल्या आपल्या बैल जोड्या सजवून सनई च्या ताफ्यात वाजत गाजत गावातील मारुती मंदिर प्रांगणात जमत असे. गावातील प्रतिष्ठित लोकांकडून मानाच्या बैल जोडीची पूजा होऊन मंदिरांना फेरी मारल्या जायच्या. गाव परिसरातील वाडी वस्तीवरील लोक या सणानिमित्त एकत्र येत त्यामुळे या सणाचा आनंद लहान थोराशी असल्याचे ज्येष्ठ शेतकऱ्यानीं सांगितले.
पूर्वी ओढ कामांसाठी बैलांची जोडी लागायची पण आता त्याची जागा ट्रॅक्टरने घेतली आहे. पूर्वी ज्यांच्याकडे जमीन त्यांच्याकडे बैलजोडी असणारच ते पण दोन नाही तर तीन बैल जोडी समीकरण ठरलेलेच असायचे. शेतकरी एकत्र येऊन शेतीच्या मशागतीची कामे करत असत. त्याला सावड म्हटले जायचे. यामध्ये दोन बैलाची नांगरी, चार आणि सहा बैलांचा नांगर यांचा समावेश असायचा. मात्र शेतीच्या वाटपामुळे कमी झालेले क्षेत्र, यांत्रिकीकरणामुळे ट्रॅक्टरची संख्या वाढली यामुळे बैलांची संख्या कमी झाली आहे. आणि बैलाचे ऋण व्यक्त करणारा सण आता मातीचे बैल खरेदी करून बैल पोळा सण साजरा करण्याची नामुष्की शेतकऱ्यावर ओढवली आहे.
बैलगाडी, औत, शिळवट, पाभर नांगर, कूळव,पारंपरिक चाड, ऊस चाळणीचे औजार, ऊस बांधणीचे औजार, रुमण, येटाण, बैलाचे चाळ, झूल, शिंगातले शेंब्या बैलाचे चाळ, मुस्की ,जोट , इत्यादी मात्र आता पुढील पिढीला फक्त फोटो मध्येच पाहायला मिळेल.