कानपुर : भारत आणि बांग्लादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका पार पडली असून भारताने बांगलादेशचा दोन्ही सामन्यांमध्ये पराभव केला आहे. यासोबतच भारताने मालिका 2-0 अशी खिशात घातली, तसेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेतील अव्वल स्थान कायम ठेवलं आहे. दुसरा कसोटी सामना ड्रॉ होण्याच्या स्थितीत असताना भारताने बाजी उलवटली आणि भारताने विजयश्री खेचून आली. बांगलादेशच्या 3 गडी बाद 107 धावा होत्या. त्यानंतर दुसरा आणि तिसरा दिवस पावसामुळे वाया गेला. त्यामुळे चौथ्या आणि पाचव्या दिवशी काय होणार? असा प्रश्न उपस्थित झाला होता. पण भारताने चौथ्या दिवशी आपलाखेल उंचावला.
बांगलादेशचा संपूर्ण संघ 233 धावांवर बाद झाल्यांनतर या धावांचा पाठलाग करताना चौथ्या दिवशीच धडाकेबाज फलंदाजी केली. जो येईल तो बांगलादेशी गोलंदाजांना ठोकून काढत असल्याचे चित्र होते. चौथ्या दिवशी 9 गडी बाद 285 धावा केल्या आणि डाव घोषित केला. भारताकडे 52 धावांची आघाडी होती. ही आघाडी मोडून काढताना बांगलादेशने तीन गडी गमवले होते. त्यानंतर शदमान इस्लामने कडवी झुंज देण्याचा प्रयत्न केला. परंतु, अर्धशतक झाल्यानंतर आकाश दीपने त्याला तंबूचा रस्ता दाखवला. तसेच जसप्रीत बुमराह, आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले.
बांगलादेशने दुसऱ्या डावात सर्व गडी बाद 146 धावा केल्या आणि भारतासमोर विजयासाठी 94 धावांचं आव्हान दिलं. भारताने हे आव्हान 3 गडी गमवून पूर्ण केलं. रोहित शर्माने आक्रमक सुरुवात करून देण्यासाठी प्रयत्न केला. पण मेहिदी हसनच्या गोलंदाजीवर हसन महमूदने त्याचा झेल घेतला आणि बाद केलं. शुबमन गिल 10 चेंडूत 6 धावा करून बाद झाला. त्यानंतर यशस्वी जयस्वाल आणि विराट कोहली यांनी सगळा मोर्चा सांभाळला.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये फायदा..
भारताने बांगलादेशविरुद्धचे दोन्ही सामने सहज जिंकल्याने भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेसाठी फायदा झाला आहे. बांगलादेशविरुद्धचा दुसरा सामना जिंकल्याने भारताची विजयी टक्केवारी 74.24 इतकी झाली असून भारतीय संघाला आता आणखी 8 कसोटी सामने खेळायचे आहेत. त्यापैकी तीन कसोटी सामने न्यूझीलंडविरुद्ध भारतात खेळायचे आहेत. तर पाच कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला जाणार आहे.